Pune Crime News | खरेदीच्या बहाण्याने महिलेचे दागिने चोरणारा जेरबंद ! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराकडून 18 लाख 50 हजारांचा ऐवज केला जप्त
पुणे : Pune Crime News | खरेदीच्या बहाण्याने सुपरमार्केटमध्ये येऊन महिलेच्या पिशवीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेणार्या सराईत गुन्हेगाराला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
जयेश चंद्रशेखर खिच्ची Jayesh Chandrashekhar Khicchi (वय ३९, रा. साई सोसायटी, मांजरी खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. खिच्ची हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हडपसर, चंदनगर, महाड शहर, वानवडी, कोंढवा, लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ७ जानेवारी रोजी येरवड्यातील जाधवनगर भागातील एका दुकानात खरेदीच्या बहाण्याने गेला. महिलेने शिलाई यंत्रावर एका पिशवीत दागिने ठेवले होते. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून दागिने ठेवलेली पिशवी आणि रोकड चोरुन नेली होती.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक हे १८ जानेवारी २०२६ रोजी पेट्रोलिंग करीत होते. पोलीस अंमलदार राहुल इंगळे व प्रफुल्ल मोरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण हडपसर माळवाडी येथील जुन्या कॅनॉलवरील पुलाजवळ सोने विक्री करण्याकरीता त्याच्याकडील स्कुटरसह थांबलेला आहे. या बातमीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन जयेश खिच्ची याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे मोठे मंगळसुत्र, लहान मंगळसुत्र, कानातील झुमके जोड व एक सोन्याची अंगठी असे १३८ ग्रॅम सोन्याचे दागिने व स्कुटर असा एकूण १८ लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. तानवडे, पोलीस अंमलदार कैलास चव्हाण, राजू पुणेकर, परेश सावंत, गणेश लोखंडे, दत्तात्रय खरपूडे, मयूर सूर्यवंशी, राहुल इंगळे, प्रफुल्ल मोेरे, विनायक येवले, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.
