Pune Crime News | भारतीय सैन्यदल, वायुसेना, नौसेना यांची गोपनीय माहिती, कागदपत्रे स्वत:कडे ठेवून नोकरी सोडून कंपनीची केली फसवणुक; तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | भारतीय सैन्यदल, भारतीय वायु सेना, भारतीय नौसेना यांच्याबरोबर काम करीत असलेल्या कंपनीतील अॅग्रीमेंट मोडल्यास कंपनीस २१ लाख रुपये देणे बंधनकारक असताना ते न देता कंपनीची फसवणुक करुन गोपनीय डाटा स्वत:कडे ठेवणार्या तरुणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आनंद मट्टा Anand Matta (वय ३५, रा. विमल टिष्ट्वन टॉवर, काटेनगर, पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अतुल नारायण चौधरी (वय ४१, रा. स्वस्ती अपार्टमेंट, प्रभात रोड, एरंडवणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ नोव्हेबर २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल चौधरी यांची आयान ऑटोनॉमस व सिमट्रॉनिक्स ऑटोमेशन या दोन कंपन्या औंध येथे आहेत. ही कंपनी ड्रोन मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात काम करत आहे. आनंद मट्टा हे कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट या पदावर काम करत होता. त्याला कंपनी वार्षिक २५ लाख रुपये पगार देत होती. आनंद मट्टा हा कंपनीमध्ये विविध प्रकल्पावर काम करत असताना त्याला कंपनीची व भारतीय सैन्य दल, भारतीय वायुसेना व भारतीय नौसेना यांची गोपनीय माहिती होती. त्याचप्रमाणे एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी लागणारी सामुग्री, आर्किटेक्चरल प्लॅन, डिझाईन डॉक्युमेंटस, प्रोक्यरमेंट प्लॅन, प्राईजिंग इन्फोरमेशन, ग्राहकांची माहिती इत्यादी सर्व माहिती ही आनंद मट्टा याच्याकडे होती. तसेच कंपनीच्या मालकीच्या असलेल्या पेटंट्स व पोर्टेशियल पेटंट्स टेक्नोलॉजीची देखील संपूर्ण माहिती आहे.
आनंद मट्टा याने कंपनीकडून घरासाठी १५ लाखांचे कर्ज १७ ऑक्टोबर २०१८ रोजी घेतले. त्यावेळी त्याने आश्वासन दिले होते की, पुढील १० वर्षे तो कंपनीबरोबर काम करेल. त्याचबरोबर आनंद मट्टा याच्याबरोबर कंपनीने अॅग्रीमेंट केले होते़ की त्याने कंपनीसोबत ३० एप्रिल २०२६ पर्यंत काम करण्याचे आश्वासन दिले. जर त्याने ३० एप्रिल २०२६ पूर्वी कंपनी सोडली तर कंपनीला कोणत्याही अटी व शर्थी शिवाय कंपनीला २१ लाख रुपये अदा करेल. या अॅग्रीमेंटप्रमाणे कंपनी सोडण्यापूर्वी त्याने कंपनीला एक वर्षाची पूर्वकल्पना देणे बंधनकारक होते.
आनंद मट्टा हा २८ नोव्हेबर २०२५ रोजी अचानक कंपनीमध्ये आला व त्याने कंपनीचा लॅपटॉप व इतर कंपनीच्या मालकीची सामुग्री ही कंपनीमध्ये ठेवून तो कंपनी सोडत असल्याचे कंपनीला ईमेलद्वारे कळवून निघून गेला. त्याच्या ताब्यात असलेल्या फाईल्स, कागदपत्रे, चालू प्रोजेक्ट रिपोर्ट, कागदी दस्ताऐवज त्याने स्वत:च्याच ताब्यात ठेवले आहे. ते कंपनीकडे जमा केलेले नाही. तसेच त्याच्या ताब्यामधील मदरबोर्ड, सेन्सर बोर्डस, पॉवर पीसीबीएस, सेन्सर्स व हार्डवेअर इत्यादी देखील त्याने कंपनीकडे जमा केलेले नाही.
त्याच्याकडे संवेदनशील डाटा असून भारतीय सैन्य दल, भारतीय वायुसेना, भारतीय नौसेना यांचा देखील संवेदनशील डाटा त्याच्याकडे आहे. त्याने कंपनीचा संवेदनशील डाटा हा कंपनीला परत केलेला नसून हा डाटा तो त्यांच्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना पुरवु शकतो. त्याच प्रमाणे भारतीय सैन्य दल, भारतीय वायु सेना, नौसेना यांचा संवेदनशील डाटा हा तो इतर देशांना देखील पुरवु शकतो. तो अचानक काम सोडून गेल्याने कंपनीचे चालू असलेल्या प्रोजेक्टस व इतर गोष्टीमध्ये जवळपास २३ कोटी ६८ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. तसेच कंपनीच्या जवळपास ८० व्हाटसअॅप ग्रुपमध्ये तो असून काही ग्रुपचा तो अॅडमिन आहे. त्या ग्रुपवर देखील कंपनीची गोपनीय माहिती आहे. ती माहिती देखील त्याने कंपनीकडे जमा केलेली नाही व तो अजूनही व्हाटसअॅप ग्रुपचा वापर करत आहे.
आनंद मट्टा याने कंपनी सोडल्यानंतर दुसरी कंपनी जॉईन करण्याच्या अगोदर त्यांच्या कंपनीला त्याच्या कामाच्या स्वरुपाबाबत माहिती देणे, कोणत्या कंपनीमध्ये तो सामील होणार आहे, याची माहिती लिखित स्वरुपात देणे बंधनकारक आहे. तसेच संरक्षण संबंधित व स्पर्धक कंपनीमध्ये तात्काळ नोकरी स्वीकारण्यास मनाई आहे. हे सर्व त्याच्यावर बंधनकारक असताना त्याने त्याची माहिती दिलेली नाही. त्याच्याकडे कंपनीचा ई मेल आयडी व पासवर्ड असून तो २८ नोव्हेंबर २०२५ नंतर सुद्धा वापरत आहे. या ईमेल आयडीवरदेखील कंपनीची गोपनीय माहिती असून तो ती माहिती सध्या वापरत असण्याचा व प्रतिस्पर्धी कंपन्यांना नवीन नोकरी मिळवण्याकरीता वापर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीतील नोकरी सोडल्यावर अॅग्रीमेंटप्रमाणे २१ लाख रुपये न देता त्याने कंपनीची फसवणुक केली आहे. पोलीस निरीक्षक आश्विनी ननावरे तपास करीत आहेत.
