Pune Crime News । पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट टाकून खुन करुन रात्रभर तिच्या शेजारी राहिला बसून खडकी पोलिसांनी पतीला केली अटक
पुणे : Pune Crime News । व्यवसायात कर्जबाजारी झालेला पती, मानसिक रुग्ण असलेली पत्नी यांच्यात भांडणे होतात. भांडणाचे कारण असते, पती घटस्फोटीत पत्नीला भेटतो, असा पत्नीला संशय असतो पत्नी झोपली असताना पती रागाच्या भरात ब्लँकेट पत्नीच्या नाका, तोंडावर टाकून दाबतो़ तिचा श्वास गुदमरुन तिचा मृत्यु होता. त्यानंतर तो तसाच रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून रहातो. सकाळी ८ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन आपण बायकोचा मर्डर केला आहे, असे सांगतो. तेव्हा पोलिसांना हा प्रकार समजतो. खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
बिंदु दिलीप कंडाथील (वय ५३, रा. ओरियन कॉम्प्लेक्स, चिखलवाडी, खडकी) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे. दिलीप नंबुरी कंडाथील (वय ५६) असे खुन करणार्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार विलास फुलसिंग राठोड (वय ३०) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कंडाथील हे व्यावसायिक असून व्यवसायात नुकसान झाल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यांची पत्नी बिंदु ही दुसरी पत्नी असून त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. ती वेगळी राहते. बिंदु ही नेहमी डिप्रेशनमध्ये असून तिच्यावर उपचार सुरु होते. त्यातूनच बिंदु हिला नेहमी संशय होता की, आपला पती दिलीप हा पहिल्या घटस्फोटीत पत्नीला भेटतो.
या संशयावरुन ती नेहमी भांडण करत असते. एका बाजूला व्यवसायातील कर्जबाजारीपणा आणि दुसरीकडे पत्नीचे रोजचे भांडण यामुळे दिलीप कंडाथील हे कंटाळून गेले होते. त्यातून पत्नी झोपली असताना २४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांनी तिच्या तोंडावर ब्लँकेट टाकून तिचे नाक, तोंड दाबले. त्यात श्वास गुदमरुन तिचा मृत्यु झाला. त्यानंतर रात्रभर तो तसाच तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. आपणही जीव द्यावा, असा विचार त्याच्या मनात येत होता. परंतु, त्याला धीर झाला नाही. शेवटी सकाळी ८ वाजता त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन आपण बायकोचा खुन केल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त जैतापूरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, सहायक पोलीस निरीक्षक सरोदे, पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनात बिंदु हिचा मृत्यु श्वास गुदमरुन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी दिलीप कंडाथील याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक देठे तपास करीत आहेत.
