Pune Crime News | आई नसताना अल्पवयीन मुलीचा नराधम करत होता विनयभंग; 5 महिन्यांपासून सुरु होता मुलीचा छळ, आंबेगाव पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पुणे : Pune Crime News | वडिलांचे छत्र हरपलेली १५ वर्षाची मुलगी घरात एकटी असताना तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग करत होता. जवळपास ५ महिने हा त्रास सहन केल्यावर या मुलीने हिंमत करुन पोलिसांकडे धाव घेतली. आंबेगाव पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
गोरख रामचंद्र यमगर Gorakh Ramchandra Yamgar (वय ३१, रा. यमगरवाडी, घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत १५ वर्षाच्या मुलीने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मागील ५ महिन्यांपासून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीच्या वडिलांचे निधन झाले आहे. फिर्यादी व तिची आई राहतात़ गोरख यमगर याने तिच्या आईशी मैत्री केली. आई घरी नसताना तो या मुलीशी जवळीक साधण्याच्या हेतूने मिठी मारत. तिच्याशी अश्लिल वर्तन करत असे. या मुलीने घाबरुन हा प्रकार कोणाला सांगितला नाही. तेव्हा त्यांची भीड आणखी चेपली. तो तिला सातत्याने त्रास देऊ लागला. शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करीत आहेत.
