Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; उत्तमनगर पोलिसांनी पतीसह नणंद, आत्येसासुवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News | Married woman commits suicide by hanging; Uttamnagar police register case against husband, in-laws, father-in-law

पुणे : Pune Crime News |  सासरी होणार्‍या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तमनगर पोलिसांनी पतीसह नणंद व आत्येसासुवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ऋतुजा लखन जाधव (वय २१, रा. शिवणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पती लखन राजु (वय २५, रा. शिवणे, मुळ रा. तळेवाडी,  बार्शी,  सोलापूर), नणंद रेखा माने (रा. बार्शी), आत्ये सासु छाया तानाजी घुले (रा. शिवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवणे येथे एप्रिल २०२४ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि लखन यांचे अडीच वर्षापूर्वी लग्न झाले होते. ते शिवणे येथे भाड्याने रहात आहेत. तिचा पती लखन हा तिला वारंवार शिवीगाळ करुन हाताने मारहाण करत असे. तिची आत्ये सासु छाया घुले व नणंद रेखा माने या तिच्याविषयी लखन याला खोटे नाटे सांगून मानसिक व शारीरीक त्रास देण्यास प्रवृत्त करत. या छळाला कंटाळून ऋतुजा जाधव हिने २१ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करीत आहेत.