Pune Crime News | पबच्या आवारात टाईट झालेल्या तरुणाचा मोबाईल, रोकड, सोनसाखळी चोरीला, बाऊंसरने चोरी केल्याचा आरोप
पुणे : Pune Crime News | राजा बहादुर रोडवरील पबच्या आवारात टाईट झाल्याने कारमध्ये झोपलेल्या तरुणाकडील सोनसाखळी, मोबाईल, रोख रक्कम असा १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयीन तरुणाने पबच्या बाऊन्सरने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत एका २५ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार राजा बहादुर मिल रोडवरील डिमोरा क्लब या पबमध्ये ३१ जानेवारीच्या रात्री घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, कल्याणीनगर परिसरातील पबमध्ये शनिवार, रविवार मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी येत असतात. अशावेळी अतिरिक्त मद्यपान केल्याने या तरुण तरुणींना अनेकदा शुद्ध रहात नाही. त्यातून त्यांच्याबरोबर अनेक गैरप्रकार होत असतात. अनेकदा त्याची तक्रारही कोणी करत नाही. या तरुणानेही शनिवारी ३१ जानेवारीच्या रात्री घडलेल्या चोरीच्या घटनेची आता १० दिवसांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादी हा महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो बावधन भागात रहायला आहे. ३१ जानेवारी रोजी तो व त्याचा मित्र डिमोरा क्लबमध्ये गेले होते. मध्यरात्री दोघेही पबमधून बाहेर पडले. दोघेही कारमधून आले होते. पार्किंगमधील कारमध्ये झोपले. त्या दरमयान तरुणाच्या गळ्यातील दिड लाख रुपयांची सोन्याची चैन, मोबाईल व साडेसहा हजार रुपये असा १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. पार्किंगमध्ये ते झोपले असताना बाऊन्सरने ही चोरी केल्याचा संशय तरुणाने व्यक्त केला आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या वेळी चोरी झाली. तेथे अंधार असल्याने सीसीटीव्हीमध्ये व्यवस्थित दिसून येत नाही. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे तपास करीत आहेत.
