Pune Crime News | मुलीचा फोटो काढल्याच्या संशयावरुन जीवे मारण्याची धमकी देऊन अपहार करुन बँक खात्यातून काढले पैसे, मुलीसह तिघांवर गुन्हा दाखल, विनयभंगाचा मुलीची तक्रार
पुणे : Pune Crime News | दोन वर्षापूर्वी पाठलाग करुन अल्पवयीन मुलीचा फोटो काढल्याच्या संशयावरुन मुलांनी एका इलेक्ट्रीशिनचे अपहरण केले. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईलचा पासवर्ड घेऊन त्यावरुन पैसे काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, यातील अल्पवयीन मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आपल्या दिशेने मोबाईल धरुन फोटो व व्हिडिओ काढले. वाईट नजरेने पाहून विनयभंग केल्याचा फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार टाटा गार्ड रुमजवळील अहिल्यानगर रोडवर तसेख खांदवेनगर येथे ३ नोव्हेबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इलेक्ट्रीशन म्हणून काम करतात. ते विमाननगर येथील गुलमोहर रॉयल सोसायटीतील आईवडिलांना भेटण्यासाठी ३ नोव्हेंबरला सकाळी साडेआठ वाजता गेले होते. त्यावेळी सोसायटीच्या वॉचमनने त्यांना फोन करुन सांगितले की, तुम्ही एका पार्सलवाली मुलीला शिवीगाळ केली होती का?, येथे दोन मुले आली आहेत. ते खाली आले. तेव्हा दोन मुलांनी तुम्ही वॉचमेन आहात का? आमची मॅडम १५ दिवसांपूर्वी पार्सल देण्यासाठी येथे आली होती. तेव्हा तुम्ही तिला शिवीगाळ केली का?. तेव्हा त्यांनी सांगितले की मी कोणत्याही पार्सलवाल्या मॅडमला ओळखत नाही. त्यानंतर त्यांनी फिर्यादी व वॉचमनचा फोटो काढून त्या मुलीला पाठविला. त्या मुलीने फिर्यादीला ओळखून १५ दिवसांपूर्वी मला शिवीगाळ करणारा इसम हाच आहे, असे सांगितले. त्यावर दोन मुलांनी आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला, असे म्हणून त्यांना मोटारसायकलवर बसवुन अहिल्यानगर रोडने टाटा गार्ड रुमजवळ नेले. तेव्हा त्यांना समजले की हे पोलीस स्टेशनला नाही तर कोठेतरी घेऊन जात आहे. त्यानंतर त्यांनी गाडीवरुन उतरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडवून ‘‘तु आमच्या मॅडमला शिवीगाळ केली आहे. तु तिचा अश्लील व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत आहे, तुला सोडणार नाही,’’असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांनी ‘‘तु आम्हाला तुझा मोबाईल फोन दिला नाही तर आम्ही तुला जीवे ठार मारु,’’ असे म्हणाले. त्यांनी जीवाच्या भितीने त्यांना मोबाईल दिला. त्यानंतर त्यांनी आम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे, असे म्हणून त्यांनी त्याचे मोबाईलचा व मोबाईलमधील फोन पे व गुगल पे या अॅपच्या पासवर्ड त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर त्यांना हाताने मारहाण केली. खांदवेनगर येथे त्यांना नेले. तेथे एक मुलगी हजर होती. त्यावेळी ती मुलगी फिर्यादींना म्हणाली, ‘‘तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. तु माझा फोटो काढला हे कबुल कर, नाही तर आम्ही तुला मारुन टाकू़’’ त्यावेळी त्यांनी फिर्यादीचा मोबाईल ओपन करुन काहीतरी केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा हाताने मारहाण करुन तू आमच्या नादाला लागला तर तुला मारुन टाकेन, अशी धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन बँक खात्याचा बॅलन्स चेक केला असता त्यांच्या खात्यातून १० हजार १९५ रुपये वेगवेगळ्या वेळी काढल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
यातील मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२२ पासून आतापर्यंत घडल्याचे तिने म्हटले आहे. आरोपीने फिर्यादीच्या दिशेने मोबाईल पकडून फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ काढून फिर्यादीकडे वाईट नजरेने पाहून फिर्यादीचा पाठलाग करुन फिर्यादी च्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.
