Pune Crime News | बीटी कवडे रोडवरील 3 दुकानात शिरुन तोडफोड करुन दहशत माजविणार्‍या तिघा अल्पवयीन मुलांसह चौघांना मुंढवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Pune Crime News | Mundhwa police have arrested four people, including three minors, who entered and vandalized 3 shops on BT Kawade Road and created panic.

पुणे : Pune Crime News |  घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील तीन दुकानात शिरुन तोडफोड करुन ‘‘कोई बिच मे आएगा तो खतम कर दुंगा’’ असे म्हणून दहशत माजविणार्‍या ३ अल्पवयीन मुलांसह चौघांना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजरत्न कुलदीप खरे (वय २०, रा. एस आर ए बिल्डिंग, भिमनगर, मुंढवा) याला अटक केली आहे. या दुकानदारांशी त्यांचे कोणतेही वाद नाहीत. केवळ आपली दहशत पसरविण्यासाठी त्यांनी ही तोडफोड करुन दुकानदारांचे मोठे नुकसान केले आहे.

याबाबत महावीरसिंग हनुमानसिंग राजपुरोहित (वय ३०, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. राजपुरोहित यांचे बी टी कवडे रोडवर कृष्णा मेडिको नावाचे मेडिकल दुकान आहे. ३१ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिघे जण अचानक दुकानात आले. त्यांनी दुकानाच्या शटरला लागून असलेले काचेचे फ्रिजरवर त्यांच्याकडील लोखंडी हत्याराने फोडून नुकसान केले. तिघे जण मोठमोठ्याने  शिवीगाळ करीत होते. त्यांच्यापैकी डोक्यावर पांढरी टोपी घातलेल्याने ‘‘कोई बिच मे आएगा तो खतम कर दुंगा’’ अशी धमकी देऊन शेजारील आराधना स्वीटच्या दिशेने निघून गेले.

आराधना स्वीटचे मालक सुरेश चौधरी व ममता सुपर मार्केट या किराणा दुकानाचे मालक रमेशकुमार चौधरी यांच्या दुकानामध्ये हे गुंड गेले. त्यांच्या दुकानाच्या शटरला लागून असलेली पाणीपुरीची गाडी, कॅश काऊंटरवरील काच व काचेचा दरवाजा असलेल्या फ्रिजरची काच फोडून नुकसान करुन दहशत माजवून पळून गेले होते.

मुंढवा पोलिसांनी या गुंडांचा शोध घेण्यासाठी तपास पथकाची टीम तयार केली. सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजरत्न खरे व त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक पोलीस फौजदार राजू कदम, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, योगेश राऊत, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

You may have missed