Pune Crime News | जनता वसाहतीत जुलै महिन्यांतील भांडणावरुन बाजीराव रोडवर खुन; तिघेही हल्लेखोर अल्पवयीन, खडक पोलिसांनी घेतले ताब्यात, गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचा वाढता सहभागाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर (Video)
पुणे : Pune Crime News | दुचाकीवरुन जाणार्या दोघा युवकांवर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने सपासप वार करुन त्यातील एका १७ वर्षाच्या युवकाचा निर्घुण खुन करण्यात आला. बाजीराव रोडवर मंगळवारी भर दुपारी झालेल्या या घटनेतील तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मयंक सोमदत्त खरारे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १६, रा. दांडेकर पुल) यालाही कोयता लागून जखम झाली आहे. अभिजित इंगळे याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयंक खरारे हा मुळचा मंगळवार पेठेत राहणारा आहे. त्याची आई महापालिकेत कामाला आहे. त्यामुळे त्यांना साने गुरुजीनगर येथे खोली मिळाली आहे. तेथे ते राहतात. जुलै महिन्यांत जनता वसाहतीतील मुलांबरोबर त्याची भांडणे झाली होती. त्यात मयंक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मयंक याचा खुन करणारा मुख्य अल्पवयीन मुलगा त्यावेळी फिर्यादी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित इंगळे आणि मयंक खरारे हे दोघे मोपेडवरुन मंडईकडे मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांचे ओळखीचे तिघे जण मोटारसायकलवरुन पाठलाग करत आले. महाराणा प्रताप गार्डन जवळील कृष्णकुंज बिल्डिंगसमोर त्यांनी इंगळे याच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. मयंक खरारे याच्या तोंडावर, मानेवर व डोक्यावर कोयत्याने ठिकठिकाणी सपासप वार केले. मयंक याला वाचविण्याचा प्रयत्न करताना इंगळे याच्यावर ही त्यांनी वार करुन जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंक याचा जागीच मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी आपली ओळख लपविण्यासाठी तोंडाला मास्क लावले होते. खडक पोलिसांनी रात्री या तिघाही हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. तिघांना बुधवारी बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक कुलदिप व्हटकर तपास करीत आहेत.
बाजीराव रोडवर झालेल्या खुनामध्ये मृत्यु पावलेला व आरोपी हे सर्वच जण १८ वर्षाखालील आहे. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमधील बाल गुन्हेगारांचा वाढता सहभाग हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ वनराज आंदेकर याचा खुन करणार्या आरोपीचा भाऊ गणेश काळे याचा कोंढव्यात गोळीबार करुन नुकताच खुन केला होता. त्यातील आरोपींवरही ते अल्पवयीन असताना गुन्हे दाखल होते.
