Pune Crime News | ‘माझा बाप पत्रकार आहे, कोणी माझे काहीही वाकडे करु शकत नाही’ ! मुलाने पालघन फिरवत दहशत माजवली; पत्रकार वडिलांनी गाडीतळ पोलीस चौकीत घातला राडा, फरासखाना पोलिसांनी दोघांसह 5 जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | रिक्षाचालकाला काल तुझा चुलता वाचला, आता तुला तर मारुनच टाकतो, अशी धमकी देऊन ‘‘माझा बाप पत्रकार आहे, कोणी माझे काहीही वाकडे करु शकत नाही,’’ असे म्हणून मुलाने लोखंडी पालघन हवेत फिरवत दहशत माजवली. या मुलांचा शोध घेण्यासाठी त्याच्या वडिलांना पोलिसांनी फोन केल. तेव्हा पत्रकार वडिल गाडीतळ पोलीस चौकीत आले. त्याने पोलिसांना ‘‘तु तर फक्त एक साधा पोलीस शिपाई आहेस, तुला तपासाचा काही एक अधिकार नाही,’’असे म्हणून पोलिसांना धक्काबुक्की केली. फरासखाना पोलिसांनी २ गुन्हे दाखल करत पितापुत्रासह ५ जणांना अटक केली आहे.
संतोष विठ्ठल खंकाळ Santosh Vitthal Khankal (वय ५३, रा. लोकसेवा तरुण मंडळाजवळ, मंगळवार पेठ), प्रथमेश संतोष खंकाळ Prathamesh Santosh Khankal (वय २२, रा. मंगळवार पेठ), हर्षद अनिल कांबळे Harshad Anil Kamble (वय १९), यश सुनिल कांबळे Yash Sunil Kamble (वय २६), आशितोष श्रीकृष्ण शिंदे Ashitos Shrikrishna Shinde (वय २३, सर्व रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत रिक्षचालक संकेत पोपट वडवराव (वय २६, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता फिर्यादी यांचे चुलते विशाल भीमराव वडवराव (वय ४२) हे औषध घेण्यासाठी जात होते. वाटेतील रिक्षा बाजूला घेण्यासाठी सांगितले असता अर्थव शिंदे याने चुलत्यांना शिवीगाळ केली होती.
त्यानंतर १४ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी फिर्यादी शिवाजी आखाडाच्या पार्किंगमध्ये मित्रांशी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी प्रथमेश खंकाळ, हर्षद कांबळे, आशुतोष शिंदे, यश कांबळे हे तेथे आले. हर्षद व आशुतोष यांनी रितेश यांला पकडून तु यांचे सोबत का बसला, म्हणून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तेव्हा फिर्यादी यांना सोडविण्यासाठी गेले. तेव्हा प्रथमेश खंकाळ याने हातातील पालघन हवेत फिरवुन “काल तुझा चुलता वाचला आता तुला तर मारुनच टाकतो,” अशी धमकी दिली. लोखंडी पालघन हवेत फिरवत‘‘माझा बाप पत्रकार आहे, कोणी माझे काहीही वाकडे करु शकत नाही’’ असे म्हणून पालघन सर्वांना दाखवत हवेत फिरवत मोठ्याने आरडा ओरडा करुन शिवीगाळ करत एकेकाला बघून घेतो, अशी धमकी दि दहशत पसरवली. फिर्यादी यांना मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मित्र अनिकेत वडवराव याने त्याचा हात पकडल्याने त्यांच्या हाताला मुक्का मार लागला. फरासखाना पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसर्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार प्रशांत अरुण कातुर्डे यांनी फिर्याद दिली आहे. ते गाडीतळ बीट मार्शल म्हणून पोलीस अंमलदार कापसे यांच्याबरोबर १४ मार्च रोजी कर्तव्यास होते. आदल्या रात्री पावणे बारा वाजता झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज आखाडा येथे झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना प्रथमेश खंकाळ याच्या वडिलांचा मोबाईल नंबर मिळाला. तेव्हा त्यांनी फोनवरुन संपर्क केला. तुमच्या मुलांनी रात्री पार्किंगमध्ये भांडणे केली असून त्यास आपण चौकशीसाठी गाडीतळ चौकीमध्ये घेऊन या, असे सांगितले. त्यावर संतोष खंकाळ याने मी डी वाय एस पीकडे जातो, असे सांगितले.
त्यानंतर दुपारी दीड वाजता फिर्यादी हे पोलीस चौकी बाहेर थांबले असताना एक जण आला. त्याने मोठ मोठ्याने आरडा ओरडा करत फिर्यादी यांच्या खांद्याला हात मारुन म्हणाला, की तुच मला फोन केला होतास का?. तु तर फक्त एक साधा पोलीस शिपाई आहेस, तुला तपासाचा काही एक अधिकार नाही, असे म्हणून एकेरी उल्लेख करुन पोलीस चौकीमध्ये गेला.
पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांच्या समोर मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन म्हणाला की, ‘‘आमचे टॅक्समधून तुझा पगार होतो, तु चौकीच्या हद्दीत काय करतो, मला माहित आहे. तुला दाखवितो, मी कोण आहे,’’ असे म्हणाला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांनी नाव विचारता, त्याने संतोष खंकाळ असे सांगितले. तुम्ही माझे काहीच वाकडे करु शकणार नाही, माझी पोहच खूप लांबपर्यंत आहे.
त्यावेळी चौगले यांनी त्याला समजावून सांगत असताना त्याने पुन्हा फिर्यादीबरोबर वाद करुन त्यांच्या अंगावर येऊन खांद्याला धक्का मारला. चौगले यांच्याबरोबर वाद करुन म्हणाला , ‘‘तुझ्या माझ्याकडे भरपूर तक्रारी आल्या आहेत, तु आरोपींना मारहाण करतो, आणि आमच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करतो. तुझी नोकरी घालवतो,’’असे म्हणत तुमची सर्वांची सीपी साहेबांना तक्रार करतो, असे म्हणून तो चौकीमधून निघून गेला.
पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्ही प्रकरणात एकूण ५ जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले तपास करीत आहेत.
