Pune Crime News | नायजेरियनांमध्ये प्रेमप्रकरणावरुन झालेल्या वादात मित्राचा केला खुन; पिसोळीतील घटना, काळेपडळ पोलिसांनी चौघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | स्टुडंट व्हिसा, बिझनेस व्हिसावर येऊन पुण्यात राहणार्या नायजेरियन तरुणांमध्ये प्रेमप्रकरणावरुन झालेल्या वादात चौघांनी एकाचा धारदार हत्याराने वार करुन खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
येमेकाक्रिस्टी एन (वय ३८, रा. शार्लिन अॅव्हेन्यू सोसायटी, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी किन्सली, जॉन पॉल ओबिन्न मोनेक (ओबी) ओजेंग्वा, नायेमेका मादुबुची ओनिया( सर्व रा. पिसोळी) या चौघांना अटक केली आहे.
याबाबत गिफ्ट सिव्होनस ऊटाह (वय ३९, रा. रिम्स स्कुलजवळ, वडाची वाडी उंड्री) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पिसोळीतील बालाजी पदमावतीनगर, लिंमरास हाईट येथे सोमवारी पहाटे ३ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व नायजेरियन स्टुडंट व्हिसा व बिझनेस व्हिसा यावर भारतात येऊन अनेक वर्षांपासून पुण्यात रहात आहेत. आरोपी आणि खुन झालेला येमेकाक्रिस्टी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत. ते सर्व एनकेनिया पॅट्रिशिया मबिगा हिच्या लिंमरास हाईटमधील फ्लॅटवर जेवायला गेले होते. येमेकाक्रिस्टी हा त्याची मैत्रिण ग्लोरी हिच्याशी बोलल्याचे व तिच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावरुन चौघांनी मटण कापण्याच्या छोट्या कोयत्याने येमेकाक्रिस्टी याच्यावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या येमेकाक्रिस्टी याला त्याच्या मित्रांनी रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे सकाळी ६ वाजता त्याचा मृत्यु झाला. याची माहिती रुबी हॉल क्लिनिकने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रुबी हॉलमध्ये जाऊन माहिती घेतली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.
