Pune Crime News | ‘‘तुझ्यामुळे आमचा संसार तुटला’’; जावयाने सासुच्या डोक्यात दगड घालून केले जखमी
पुणे : Pune Crime News | माहेरी राहत असलेल्या पत्नीला सासरी चल असे सांगत असताना मध्ये बोलणार्या सासुला ‘‘तुझ्यामुळे आमचा संसार तुटला, तू मध्ये बोलू नको,’’असे म्हणून रस्त्यावर पडलेला दगड उचलून जावयाने सासुच्या डोक्यात घालून जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत आशाबाई माधव हनवते (वय डोमखेल रोड, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांचे जावई अंकुश रंगराव मंडादे (वय २८, रा. डोमखेल रोड, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाघोली येथील हंसराज सुपर मार्केट येथील फिर्यादीच्या घरासमोर १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशाबाई हनवते यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची मुलगी संध्या मंदाडे हिचा अंकुश मंदाडे यांच्याबरोबर ५ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. ते आईवडिलासोबत वडजाई रोड येथे रहात होते. दोघांमध्ये कौटुंबिक वाद असल्याने गेल्या २ महिन्यांपासून संध्या ही आईकडे येऊन राहिली आहे. त्यानंतर मागील ३० दिवसांपासून जावई अंकुश हाही त्यांच्याबरोबर राहू लागला आहे. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घरासमोरील हंसराज सुपर मार्केट येथे हनवते या उभ्या होत्या.
त्यावेळी अंकुश मंदाडे हा संध्या हिच्याबरोबर “तु आई सोबत राहू नकोस, तु माझे सोबत माझे आई वडिलांसोबत राहण्यास वडजाई रोड येथे चल,” असे म्हणून तिच्याशी वाद घालत होता. संध्या हिला हाताने मारहाण करीत होता. त्यावेळी आशाबाई हनवते त्याला म्हणाल्या की, तिला मारहाण करु नका, ती स्वखुशीने येत असेल तर तिला घेऊन जा, असे म्हणाले. त्यावर अंकुश याने ‘‘तुझ्यामुळे आमचा संसार तुटला, तु मध्ये बोलू नको’’, असे म्हणून रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात उजव्या कानाचे वर दगड मारुन दुखापत केली. पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार तपास करीत आहेत.
