Pune Crime News | दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी जेरबंद करुन त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
अजित सागर कसबे Ajit Sagar Kasbe (वय २१, रा. विघ्नहर्ता सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार महेश राजेंद्र मंडलिक यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तपास पथक १३ मार्च रोजी सायंकाळी गस्त घालत असताना पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जनता वसाहत नविन कॅनॉड रोड लगत असणार्या पार्किंगमध्ये आपला चौक येथे एक जण थांबलेला असून त्याचे कमरेला काहीतरी घातक शस्त्र खोचलेले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांनी वरिष्ठ अधिकार्यांना कळविले. पोलिसांचे पथक आपला चौक येथे गेले. पोलिसांनी चारही बाजूने घेरुन अजित कसबे याला पकडले. त्याची झडती घेतली असता शर्टच्या खाली कमरेला ४० हजार ५०० रुपयांचे सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले. पर्वती पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सूर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख, अमोल दबडे यांनी केली आहे.
