Pune Crime News | मेडिकल दुकानात बनावट बिले करुन फार्मासिस्टने डॉक्टरांना घातला 10 लाखांचा गंडा; लेखा परिक्षणात तोटा दिसून आल्याने उघड झाला अपहार
पुणे : Pune Crime News | मेडिकल दुकानातील व्यवहाराचे डॉक्टरांनी सी ए कडून लेखा परिक्षण करुन घेतले़ त्यात दुकानाला तोटा होत असल्याचे दिसून आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असताना तोटा कसा होऊ शकतो, याची तपासणी केल्यावर मार्फासिस्टने १० लाख २६ हजार ९६४ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत डॉ. श्रीपाद सूर्यकांत पुजारी (वय ५५, रा. मुकुंद हौसिंग सोसायटी, मुकुंदनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी आकाश रामधन ढगे (वय २६, रा. येवलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंकुंदनगरमधील बिझनेस कोर्ट येथील स्वास्थ मेडिकलमध्ये १ एप्रिल २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीपाद पुजारी यांनी स्वास्थ मेडिकल येथे आकाश ढगे याची फार्मासिस्ट म्हणून नेमणूक केली होती. तो ३ वर्षे त्यांच्याकडे काम पहात असे. औषध उत्पादक कंपन्यांच्या अनेक वेगवेगळ्या योजना असतात. १० गोळ्यांच्या स्टिपवर ते ४ गोळ्या मोफत देतात. याशिवाय आणखी काही योजना असत. आकाश ढगे हा औषध कंपन्यांकडून मोफत योजनांमध्ये जी औषधे मिळत. ते हिशोबात धरत नसे. अशी औषधे तो ग्राहकांना विक्री करुन त्यांच्याकडून स्वत:च्या बँक खात्यात पैसे घेत असत. काही बिले रोख स्वरुपात स्वत: स्वीकारुन तो डॉक्टरांची फसवणूक करीत होता.
डॉ. पुजारी यांनी मेडिकलचे लेखा परिक्षकाकडून ऑडिट करुन घेतले. त्यात त्यांना तोटा दिसू लागला. तेव्हा त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर औषधांची खरेदी होत आहे. मग, तोटा कसा झाला, याची तपासणी केली तेव्हा, आकाश ढगे याने अपहार केल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर त्यांनी आकाश ढगे याला कामावरुन काढले होते़ मेडिकलचे संपूर्ण लेखा परिक्षण केल्यानंतर आकाश ढगे याने १० लाख २६ हजार ९६४ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉ. पुजारी यांनी आता फिर्याद दिली आहे.
आकाश ढगे याने मित्राच्या बरोबर कोंढवा येथे नवीन दुकान टाकले असून त्याचा तपास सुरु असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्मीता पाटील यांनी सांगितले.
