Pune Crime News | बनावट आधार कार्डच्या सहाय्याने राहणार्‍या बुधवार पेठेतील दोन बांगला देशी महिलांवर पोलिसांची कारवाई

crime

पुणे : Pune Crime News |  पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी बुधवार पेठेत विशेष शोध मोहिम राबविली. त्यात दोन बांगला देशी महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर दोघींकडे आधार कार्ड होते.

बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर बांगला देशी महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी या परिसरात वारंवार छापा घालून आतापर्यंत अनेक बांगला देशी महिला व काही पुरुषांना पकडले आहे. त्यातील काही जणांची बांगला देशात रवानगी करण्यात आली आहे. हद्दपारी संबंधीच्या नवीन सरकारी आदेश व नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता जलद हद्दपारी शक्य झाली आहे.

बुधवार पेठेत शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन बांगला देशी महिला आढळून आल्या. त्या दोघींकडे आधार कार्ड होते. त्यांना ती आधार कार्ड कुठून मिळाली याचा पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.

सलग दुसर्‍या दिवशी सार्वजनिक ठिकाणी तपासणी

पोलीस दलाच्या परिमंडळ १ च्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी सलग दुसर्‍या दिवशी तपासणी मोहीम राबविण्यात आली. फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकळ्या जागा, ब्लॅक स्पॉट, सार्वजनिक ठिकाणे येथे होणारे अवैध प्रकार तसेच सार्वजनिक सुरक्षितेला बाधा आणणार्‍या घटना रोखण्यासाठी तपासणी मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने राबविण्यात आली.

४२ सार्वजनिक ठिकाणे, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने यांची तपासणी करण्यात आली. त्यात भा. न्या. सं. कलम २८५ प्रमाणे सार्वजनिक रस्ता अडविणार्‍या ३ गुन्हे, कोटपाप्रमाणे १२ खटले, ट्रिपल सीट कारवाई – ३१, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत २२ खटले, एन डी पी एस कायद्यान्वये २ गुन्हे, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले व परिमंडळ १ मधील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी केली आहे.

You may have missed