Pune Crime News | स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुणाला नदीपात्रात धमकावुन लुबाडणार्या दोघांना पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुणाला धमकावुन लुटणार्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.
निखिल संदीप जाधव Nikhil Sandeep Jadhav (वय २०, मारुती मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत), ओंकार रमेश गरुड Omkar Ramesh Garud (वय २१, रा. महात्मा फुले वाड्याजवळ, महात्मा फुले पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत नागेश हनंमत पाटील (वय २१, रा. राज सगमवाडी मठ, पेरुगेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तो आणि त्याची मावस बहीण हे शुक्रवारी १० एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास नदीपात्रातील रस्त्याने निघाले होते. त्या वेळी आरोपी जाधव आणि गरुड हे दुचाकीवरुन तेथे आले. तरुणाला आणि त्याच्या मावस बहिणीला कोयत्याचा धाक दाखविला. तरुणाला धमकावून पैसे मागितले.
तरुणाच्या मोबाईलमधील फोन पेवरुन ऑनलाईनने जबरदस्तीने १ हजार रुपये ट्रान्सफर करायला लावले. त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. पाटील यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पहाटेच्या वेळची परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यातून आरोपींची नावे निष्पन्न करुन दोघांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील तपास करत आहेत.
