Pune Crime News | अंमली पदार्थ तस्करीचा पोलीस हवालदारच मुख्य सुत्रधार ! पोलिसांनी जप्त केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल कक्षातून चोरुन केली विक्री
पुणे : Pune Crime News | पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेला अंमली पदार्थ अहिल्यानगर पोलिसांच्या केंद्रीय मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ चोरुन त्याची बाहेर विक्री केल्याप्रकरणाचा पोलीस हवालदारच मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलीसच अमली पदार्थाच्या तस्करीचा सुत्रधार असल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शामसुंदर विश्वनाथ गुजर Shamsunder Vishwanath Gujar (वय ३९, रा. नेप्ती,ता. जि. अहिल्यानगर) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गुजर हा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार पदावर कार्यरत होता. तो मुद्देमाल कारकून म्हणून काम पाहत होता. त्यामुळे त्याला कोणत्या कारवाईत किती अमली पदार्थ जप्त केले याची माहिती होती. त्याच संधीचा फायदा घेत त्याने हे कृत्य केल्याची माहीती आहे. गुजर याने मुद्देमाल कक्षातून अल्प्राझोलम हा अमली पदार्थ बाहेर काढताना आपली चोरी पकडू नये म्हणून त्या ठिकाणी अमली पदार्थासारखा दिसणारा दुसरा तत्सम पदार्थ ठेवल्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विक्रीसाठी बाहेर काढलेला अल्प्राझोलम हा अमली पदार्थ श्रीरामपूर पोलिसांनी २०२५ मध्ये कारवाई करून जप्त केलेला होता. त्याची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे.
याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पोलिस हवालदार गुजर याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. शादाब रियाज शेख (वय ४१, रा. डंबेनाला, शिरुर),ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे (वय ३७), ऋषीकेश प्रकाश चित्तर (वय ३५, रा.कुरूंद,ता.पारनेर),महेश दादाभाऊ गायकवाड ( वय ३७, रा़ हिंगणी, ता. श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. आरोपींच्या विरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांना १७ जानेवारी रोजी माहिती मिळाली होती. त्यानुसार शिरुर येथे शादाब शेख या गॅरेज मालकाच्या ताब्यातून १ किलो ५२ ग्रॅम अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ मिळून आला होता. शादाब याला हा अंमली पदार्थ ज्ञानदेव शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून घेतला असल्याचे निष्पन्न झाले. तिघांच्या चौकशीतून त्यांच्याकडील उर्वरित ९ किलो ६५५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला. ऋषिकेश चित्तर यास शामसुंदर गुजर या पोलिसाने दिल्याचे निष्पन्न झाले. गुजर याने १० किलो ७०७ ग्रॅम अल्प्राझोलम मुद्देमाल कक्षातून बाहेर काढले होते. पोलिसांनी हा सर्व अंमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा २५ ते ३० कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे.
कोण आहे पोलीस हवालदार शामसुंदर गुजर
२००८ मध्ये अहिल्यानगर पोलीस दलात शामसुंदर गुजर भरती झाला. त्याची पहिली नेमणूक पारनेर पोलीस ठाण्यात झाली. तेथे मुद्देमाल कारकूनची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाणे, त्यानंतर अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली. तेथे त्याच्याकडे परत मुद्देमाल कारकूनची जबाबदारी मिळाली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, गोविंद खटींग, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे, पोलीस अंमलदार पोपट गायकवाड, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, निलेश शिंदे, राहुल पवार, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, समाधान नाईकनवरे, भाऊसाहेब पुंड, सचिन घाडगे, धीरज जाधव, अजित भुजबळ, आसिफ शेख, दीपक साबळे, अक्षय नवले, संदीप वारे, हनुमंत पासलकर, तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, गणेश धनवे, बाळासाहेब खडके, नितीन सुद्रीक, बाळु भवर, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे यांनी केली आहे़ शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
