Pune Crime News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात OSD असल्याचे सांगून तोतयागिरी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime News | Police nab impersonator claiming to be OSD in Deputy Chief Minister Eknath Shinde's office

पुणे : Pune Crime News | सॉफ्टवेअर फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देऊन स्वत:ला उपमुख्यमंत्री यांचे कार्यालयात ओएसडी असल्याचे भासवून तोतयागिरी करणार्‍यावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

प्रद्युम्न श्रीहरी पाटील Pradyuman Srihari Patil (वय ४७, रा. लिजंट सोसायटी, हिंजवडी) असे या तोतयाचे नाव आहे. ही घटना परिमंडळ १ पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात १ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले (IPS Krushikesh Rawale) यांनी सांगितले, समर्थ पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअरबाबत फसवणुकीचा गुन्हा २०२१ मध्ये दाखल करण्यात आला होता. हा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. यातील तक्रारदार आगरवाल यांच्या मित्राच्या माध्यमातून प्रद्युम्न पाटील याची ओळख झाली होती. त्याने आगरवाल यांना आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे सांगितले. तुम्हाला पोलिसांच्या मदतीने कोर्टाबाहेर नुकसानभरपाई मिळवून देतो. १० टक्के मला द्यावे लागतील, असे सांगितले होते.

प्रद्युम्न पाटील हा बुधवारी दुपारी साडेचार वाजता पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात आला. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे त्याने सांगितले. थेट उपमुख्यमंत्री यांचा ओएसडी आल्याचे पाहून पोलीस गडबडून गेले. त्याने पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेतली. समर्थ पोलीस ठाण्यातील या केसमध्ये पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही. मी अनेकदा मेसेज केले़ त्याला उत्तर दिले नाही, असे तो सांगू लागला. त्यामुळे ऋषिकेश रावले यांना संशय आला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात चौकशी केली. त्यात असा कोणी माणूस ओएसडी नसल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी चौकशी केल्यावर त्याची तोतयागिरी उघड झाली. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला नोटीस दिले असून आज चौकशीसाठी बोलावले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करीत आहेत.

You may have missed