Pune Crime News | गावाकडील जमीन विकत देण्यासाठी पोलीस अंमलदार चुलत पुतण्याने पैसे घेऊन परस्पर दुसर्याला जमीन विकून महापालिका अधीक्षक असलेल्या चुलतीची केली फसवणूक

पुणे : Pune Crime News | पोलीस अंमलदार असलेल्या चुलत पुतण्याने गावाकडील १२ एकर जमीन विकत देण्याचा प्रस्ताव ठेवून पैसे घेतले. त्यानंतर खरेदीखत करुन देण्याऐवजी परस्पर दुसया जमीन विक्री करुन पुणे महापालिकेत कार्यालय अधीक्षक असलेल्या चुलतीची ६१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत रजनी हनुमंत वाघमोडे (वय ५०, रा. रायकरनगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन कल्याण वाघमोडे (रा. मांजरी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२४ ते डिसेंबर २०२४ दरमयान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजनी वाघमोडे या पुणे महानगर पालिकेत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. सचिन वाघमोडे हा पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेत पोलीस अंमलदार आहे. रजनी वाघमोडे यांचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी हे मुळ गाव आहे. त्या गावाकडे जमीन खरेदी करण्याचे शोधात होत्या. त्यांच्या शेत जमिनी लगत चुलत पुतण्या सचिन वाघमोडे यांची शेत जमीन आहे. त्यांनी आम्हाला शेत जमीन विकायची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात बोलणे झाले. सचिन वाघमोडे, सरस्वती वाघमोडे, नितीन वाघमोडे व इतरांची सर्व मिळून १२ एकर जमिनीचा दर १ कोटी ८ लाख रुपये ठरला होता. त्यानुसार त्यांनी सर्वांना मिळून एकूण ८० लाख रुपये रोख व धनादेशाद्वारे दिले. जमिनीचे साठे खत व खरेदीखत कधी करुन देणार असे त्यांनी सचिन वाघमोडे यांना विचारले.
तेव्हा सचिन वाघमोडे याने तुम्ही उर्वरित पैसे द्या, मग आपण खरेदी खत करुन घेऊ, असे सांगितले. त्यानंतर सचिन वाघमोडे हा पत्नी व मुलासह त्यांना भेटायला कार्यालयात आला होता. तेव्हा त्यांनी खरेदीखताविषयी विचारल्यावर त्याने २८ लाख दिले की खरेदीखत करुन घेऊ, असे बोलला. तेव्हा रजनी वाघमोडे यांनी अगोदरच तीन चतुर्थांश रक्कम दिलेली आहे. तुम्ही खरेदीखत अगोदर करुन द्या, मग मी तुम्हाला उर्वरित पैसे देते, असे सांगितले. त्यावर सचिन वाघमोडे म्हणाला की, आमची जमीन आम्हाला तुम्हाला द्यायची नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, माझी नोकरी गेली तरी चालेल, पण तुम्हाला जमीन विकणार नाही. त्याने खरेदी खत करुन देण्यास नकार दिला.
१ फेब्रुवारी २०२५ रोजी सचिन वाघमोडे याने इतरत्र जमिनीचा व्यवहार केला असल्याचे रजनी वाघमोडे यांना समजले. जमिनीच्या व्यवहारात त्यांच्याबरोबर व्यवहार चालू असताना त्याने दुसरीकडे व्यवहार करुन ती जमीन फिर्यादी यांना न देता दुसरीकडे खरेदी खत करुन विक्री केली आहे. या जमिनीच्या नोंदीबाबत फिर्यादी यांनी टाकळी सिकंदरचे मंडल अधिकारी यांच्याकडे अर्ज करुन हरकत घेतली होती. परंतु, सचिन वाघमोडे याने मंडल अधिकारी यांना खोटी माहिती दिल्याने त्यांची तक्रार निकाली काढण्यात आली. रजनी वाघमोडे या फसवणुकीची तक्रार करणार हे समजल्यावर सचिन वाघमोडे, नितीन वाघमोडे व इतरांनी ८० लाखांपैकी वेगवेगळ्या कारणासाठी दिलेले १९ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले. उर्वरित ६१ लाख रुपये परत न करता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करीत आहेत.