Pune Crime News | पोलीस उपनिरीक्षकाने विषारी औषध पिऊन उचलले टोकाचे पाऊल; डेक्कन जिमखान्यावरील हॉटेलमध्ये घडली घटना
पुणे : Pune Crime News | सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोलीस उपनिरीक्षकाने विषारी औषध पिऊन टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले.
पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे (वय २६) असे त्यांचे नाव आहे. पोलीस सेवेत भरती होऊन त्यांना २ वर्षे झाली होती़ ते अविवाहित होते.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, सुरज मराठे हे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पोलीस उपनिरीक्षक होते. डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवरील एका हॉटेलमध्ये ते मंगळवारी उतरले होते. त्यांची रुम कालपासून बंद होती. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचार्यांनी दरवाजा वाजविला तरीही त्यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हॉटेलचालकांनी पोलिसांना कळविले. पोलीस हॉटेलमध्ये पोहचले.
सुरज मराठे हे गेल्या ८ दिवसांपासून रजेवर होते. सुरज मराठे यांच्याशी संपर्क होत नसल्याने तासगाव पोलीस व त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. ते मराठे यांचे लोकेशन तपासत तेथे हॉटेलवर पोहचले.
हॉटेल कर्मचार्यांनी दुसर्या चावीने रुम उघडली. आतमध्ये सुरज मराठे यांचा मृत्यु झाला होता. त्यांनी विषारी औषध पिले असल्याचे दिसून आले. त्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात आजाराला कंटाळून हे कृत्य करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांना एक वर्षापासून गुडघ्याचा त्रास होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. सुरज मराठे हे अविवाहित होते. शवविच्छेदनासाठी त्यांचे पार्थिव ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे.
