Pune Crime News | पूजा खेडकर यांचे हातपाय बांधुन नोकरानेच टाकला दरोडा; आईवडिलांसह पाच जणांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन केले बेशुद्ध

Pune Crime News | Pooja Khedkar's hands and feet tied by her servant; Five people including her parents were made unconscious by giving them a numbing medicine in their food

पुणे : Pune Crime News |  बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडिल दिलीप आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह घरातील ५ जणांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पूजा खेडकर हिचे हातपाय बांधून घरातील नोकराने इतरांच्या मदतीने दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला यांनी सांगितले की, दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे आता शुद्धीवर आले असून सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तसेच रखवालदार जितेंद्रसिंग, वाहनचालक दादासाहेब ढाकणे आणि स्वयंपाकी सुजित रॉय यांची प्रकृती स्थिर असून आज  सोमवारी त्यांच्याकडून अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलीस अंमलदार उमेश रजेसिंग कोळी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हिकमत व त्याच्या ६ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार त्यांच्या घरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

पूजा खेडकर यांचा बाणेर रोडवरील नॅशनल हौसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. त्यांच्या घरात १० ते १५ दिवसांपूर्वी एक नोकर कामाला ठेवला होता. दिलीप खेडकर व मनोरमा खेडकर यांनी शनिवारी रात्री जेवण केले. पूजा खेडकर या जीममधून रात्री उशिरा घरी आल्या. त्यांनी घरात पाहिले तर आईवडिल बेशुद्ध पडले होते. त्याच वेळी घरात शिरलेल्या ४ ते ५ चोरट्यांनी त्यांना पकडून हात पाय बांधले. घरातील चीजवस्तू चोरुन नेल्या. त्यानंतर काही वेळाने त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेऊन दिल्लीतील मित्राला फोन केला.

या मित्राने त्याच्या चुलत भावाला फोन करुन हा प्रकार सांगितला. तो तातडीने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंगल्यावर गेला. त्यांनी तेथे नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांना हा प्रकार कळविला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांच्या बंगल्यात जाऊन पाहणी केली. तेव्हा बंगल्यातील कार पार्किंगजवळ रखवालदार जितेंद्रसिंग हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. खेडकर यांचे आई वडिल पलंगावर बेशुद्धावस्थेत आढळले. एका खोलीत वाहनचालक दादासाहेब ढाकणे तर बंगल्याबाहेरील एका खोलीत स्वयंपाकी सुजित रॉय हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. आई वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारानंतर तक्रार देईन, असे पूजा खेडकर हिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

You may have missed