Pune Crime News | पुजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द ! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा आदेश

Pooja Khedkar

पुणे : Pune Crime News |  बडतर्फ आयएएस पुजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची शेतकर्‍याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना नुकताच रद्द केला आहे. त्यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात नोकराने गुंगीचे औषध देऊन जबरी चोरी करण्याची घटना शनिवार मध्यरात्री घडली होती. त्यात बेशुद्ध असलेल्या पाचही जणांची प्रकृती आता सुधारत आहे. पुजा खेडकर व त्यांच्यापैकी कोणीही पोलिसांना अजूनही कोणतीही माहिती दिली नाही.

याबाबत पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला यांनी सांगितले की, मनोरमा खेडकर या कालपर्यंत व्हेटिलेटरवर होत्या. इतरांचीही प्रकृती सुधारली आहे. आतापर्यंत कोणीही हा प्रकार कसा घडला याबाबत स्टेटमेंट दिलेले नाही. डॉक्टरांच्या परवानगीनंतर पोलीस आज त्यांचे स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार कसा घडला हे समोर येऊ शकेल़.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात एका शेतकर्‍याला मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना २०२४ मध्ये घडली होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह ७ जणांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  त्यांच्याविरुद्ध नवी मुंबईतील रबाळे व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर  पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार मनोरमा खेडकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून खुलासा केला होता. त्यांचा खुलासा समाधानकारक न वाटल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या आठवड्यात त्यांचा शस्त्र परवाना रद्द करीत असल्याचा आदेश काढला होता.

मनोरमा खेडकर यांना नोटीस बजाविल्यानंतर त्यांनी खुलासा सादर केला. त्याचे म्हणणे समाधानकारक वाटले नाही. खेडकर यांचे वर्तन कायद्यास न जुमाणारे आहे. भविष्यात त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्ती, तसेच सामान्य नागरिकांच्या जिवितास धोका पोहचू शकतो. शस्त्राचा दुरुपयोग करुन अटी, शर्तींचा भंग केला जाण्याची शक्यता आहे. खेडकर शस्त्र बाळगण्यास योग्य व्यक्ती नाहीत. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्तांनी ६ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

खेडकर यांच्या नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगल्यात नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील ५ जणांवर बेशुद्ध केले होते. पुजा खेडकर यांचे हातपाय बांधुन ठेवून घरातील चीजवस्तू, मोबाईल चोरुन नेले आहेत. परंतु, खेडकर यांच्याकडून अजूनही कोणतीही माहिती न दिल्याने चोरट्यांनी घरातून काय चोरुन नेले, याचा तपशील समोर आला नाही.

You may have missed