Pune Crime News | ‘‘प्रार्थना केल्याने कॅन्सर, टी बी सारखे आजार बरे झाले’’; मिटिंग घेऊन अंधश्रद्धा परसविणार्या दोघांना गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | धनकवडीतील मोहननगर येथे मिटिंग घेऊन त्यात प्रार्थना केल्यास कॅन्सर, टी बीसारखे आजार बरे झाले, असे लोकांना बोलायला लावून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न करणार्या दोघांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत निखिल बळवंत पालकर (वय ३६, रा. नवनाथनगर, धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मॅक्सिन एंटनी, थेक्केलियील (वय ४७, रा. दमवस्ती, शिंगणापूर, सासवड) आणि सजी जॉर्ज (वय ४८, रा. सन्क्ला एन्क्लेव्ह, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीमधील मोहननगर येथील आर क्युब सांस्कृतिक हॉलमध्ये २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र आर क्युब सांस्कृतिक हॉलमधील कार्यक्रमाला गेले होते. तेथे मॅक्सिन यांनी मी प्रार्थना केल्याने लोकांचे कॅन्सर, टी बीसारखे आजार बरे झाले आहे. तसेच हॉलमध्ये जमलेल्या लोकांपैकी दोन लोकांना पुढे बोलावून मी एकेकाळी भिकारी होतो. येशुची प्रार्थना केल्याने मी श्रीमंत झालो आहे़ दुसर्या व्यक्तीने माझी आई आजारी होती, धर्मगुरुंनी प्रार्थना केल्यामुळे माझ्या आईचा आजार बरा झाला, असे बोलायला लावून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना नोटीस दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करीत आहेत.
