Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण; एकाची प्रकृती चिंताजनक

Pune Crime News | Prisoner brutally beaten up in Yerwada jail; One in critical condition

पुणे : Pune Crime News |  येरवडा कारागृह येथे दोन कैद्यांमधील वादातून एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात एक कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एका कैद्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवकरण्या गराळे (वय ६५) असे गंभीर जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणात कैदी फजिल अहमद अब्दुल कयुम अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारागृहातील हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गराळे आणि अन्सारी या दोघांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावलेली असून, कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांना कामावर ठेवण्यात आले होते. ५ जानेवारी रोजी खुल्या कारागृहातील बराक क्रमांक एक परिसरात किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अन्सारी याने गराळे यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसे मारले. मारहाणीत गराळे फरशीवर कोसळले आणि गंभीर जखमी झाले.

या हल्ल्यात गराळे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सी. बी. बेरड करत आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यातही येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका सराईत कैद्याने फरशीच्या तुकड्याने दुसऱ्या कैद्यावर हल्ला केला होता. त्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कैद्याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

You may have missed