Pune Crime News | पुणे : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये असलेल्या गुन्हेगारांमध्ये तुंबळ हाणामारी, दोघांनी फरशी डोक्यात घालून केला एकाच्या खुनाचा प्रयत्न

Pune Crime News | Pune: A fight broke out between criminals in Yerwada Jail for murder, two of them tried to murder one by putting a floor on his head

पुणे : Pune Crime News |  खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायलयीन कोठडीत असलेल्या आरोपीमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांनी एका आरोपीच्या डोक्यात फरशी घालून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.

विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. विशाल कांबळे हा संदीप सुभाष देवकर (वय ४९, रा. नवी खडकी, येरवडा) याचा खुन केल्याच्या आरोपातून येरवडा कारागृहात आहे. हातगाडी लावण्याच्या वादातून विशाल कांबळे व इतरांनी ५ जानेवारी २०१९ रोजी रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करुन संदीप देवकर याचा खुन केला. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात असून त्याचा अजून जामीन झाला नाही.

आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, लक्ष्मीनगर, येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्यावर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आकाश चंडालिया याने साथीदारांसह विकी चंडालिया याच्यावर अग्रेसन स्कुल समोर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. ही घटना १९ एप्रिल २०२४ रोजी रात्री एकच्या सुमारास घउली होती. याप्रकरणात आकाश चंडालिया हा तेव्हापासून येरवडा कारागृहात न्यायलयीन कोठडीत आहे.

याबाबत तुरुंग अधिकारी सचिन गोविंदराव गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजता येरवडा कारागृहात बॅरेक १ च्या आतमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे गुन्हेगार न्यायालयीन कोठडीत आहेत. तिघांना एकाच बॅरेकमध्ये ठेवले होते. ते एकत्र गप्पागोष्टी करत असत. एकमेकांची चेष्टामस्करीही करत होते. त्यातूनच त्यांच्यात भांडणे झाली. १५ डिसेंबर रोजी सकाळी लवकर उठल्यानंतर सर्व आवरुन विशाल कांबळे हा पुन्हा झोपला होता. त्यावेळी आकाश चंडालिया व दीपक रेड्डी यांनी दरवाज्याजवळ झोपलेल्या विशालच्या डोक्यात व कमरेवर दगडी फरशीने एका पाठोपाठ एक घाव घातले. या प्रकारामुळे इतर कैद्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा कारागृहातील रक्षक, अधिकार्‍यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी आकाश चंडालिया व दीपक रेड्डी यांना बाजूला करुन विशाल कांबळे याला तातडीने ससून रुग्णालयात नेले. विशाल कांबळे याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती समजल्यावर सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक जर्‍हाड तपास करीत आहेत.

You may have missed