Pune Crime News | पुणे: पत्नीच्या अंगावर पाणी सांडल्याचा राग, चाकूने वार करत धाकट्या भावाचा खून

Pune Crime

पुणे : Pune Crime News | किरकोळ कारणातून थोरल्या भावाने धाकट्या भावावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सौरभ संजय देठे (वय -२२, रा. मंचर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंचर (ता-आंबेगाव) येथे घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी आरोपी रोहित संजय देठे (वय -२४, रा. छत्रपती संभाजी महाराज चौक, सिद्धार्थनगर, मंचर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील सिद्धार्थनगर येथे सौरभ देठे यांच्या घरासमोर त्यांचा भाऊ रोहीत देठे यांची पत्नी नंदीनी देठे या बुधवारी (दि. १९) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कपडे धुत होत्या. नंदिनी यांच्या अंगावर सौरभ देठे याच्याकडून पाणी सांडल्याचा राग आल्यामुळे रोहित याने शिवीगाळ, दमदाटी करून हातातील चाकुने सौरभ याच्या अंगावर जागोजागी वार करुन गंभीर जखमी केले.

त्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालय, पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण व त्यांनतर ससून रुग्णालय पुणे येथे सौरभ याच्यावर उपचार सुरु होते. पण, बुधवारी (दि. २६) सौरभ यांचा मृत्यू झाला. याबाबत सौरभ याचा आतेभाऊ स्वप्नील काळूराम जाधव (वय-२६, रा. मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. या घटनेचा अधिक तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत.

You may have missed