Pune Crime News | पुणे : सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त करुन भारती विद्यापीठ पोलिसांनी उधळला घातपाताचा कट
पुणे : Pune Crime News | गावठी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणार्या सराईत गुन्हेगाराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून करण्यात येणार्या घातपाताचा कट उधळला आहे.
लक्ष्मण दगडु कचरे Laxman Dagdu Kachre (वय २२, रा. सच्चाईमाता, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी वेल्हे पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कात्रज येथील गंधर्व लॉन्सचे पुढे कात्रज घाटाकडे जाणार्या रोडवर एक जण पिस्तूल घेऊन वावरत आहे. या माहितीची शहानिशा करुन पोलीस पथक संबंधित ठिकाणी पोहचले. त्यांनी लक्ष्मण कचरे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपयांचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस मिळून आले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे.
