Pune Crime News | पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन युवकांकडून तीक्ष्ण हत्याराने वार करुन 19 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; सिंहगड रोडवरील आनंदनगरमधील मधील घटना, तिघे अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  एकमेकांकडे पाहण्यावरुन पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघा अल्पवयीन युवकांनी एका महाविद्यालयीन युवकावर तीक्ष्ण हत्याराने मानेवर, डोक्यावर व पाठीवर वार करुन निर्घुण खुन केला. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

करण गिरीश काशिद (वय १९, रा. धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी गाव) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत श्रेयस संतोष आमले (वय १८, रा. अरविंद सोसायटी, आनंदनगर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना आनंदनगर येथील सार्थक बंगला येथील सार्वजनिक रोडवर सोमवारी १६ मार्च रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण काशिद हा १२ वीमध्ये शिक्षण घेत होता. आरोपी मुलांपैकी दोघे जण १० व १२ वी मध्ये शिकत आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वी कर्वेनगर येथे एकमेकांकडे पाहण्यावरुन  भांडणे झाली होती. फिर्यादी, करण काशिद आणि त्यांचा मित्र समर दळवी हे गप्पा मारत उभे असताना आरोपी मुले तेथे आले. त्यांनी काही समजण्याच्या आतच आपल्याकडील लोखंडी शस्त्राने करणवर हल्ला केला. त्याच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर सपासप वार केले. वर्मी घाव लागल्याने करण जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्लेखोरांना त्याच्या मित्रांनी पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र समर दळवी यांना रस्त्यावरील दगड फेकून मारले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक आडगळे, समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनाची माहिती घेऊन आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. पोलिसांनी रात्रीतून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक समीर गायकवाड तपास करीत आहेत.

You may have missed