Pune Crime News | पुणे : कुणाल कामराच्या समर्थनार्थ अलका टॉकिज चौकात फ्लेक्स लावणार्‍यावर गुन्हा दाखल

Shivsena UBT

पुणे : Pune Crime News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विडंबन काव्य करणार्‍या कुणाल कामराविरोधात विधानसभेत जोरदार वादंग झाल्यानंतर आता त्याचे समर्थन करणारा फ्लेक्स अलका चित्रपटगृहाजवळील छत्रपती संभाजी महाराज पुलावर लावण्यात आला होता. हा फ्लेक्स लावणाऱ्या अज्ञातावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत राजेंद्र भानुदास केवटे (वय ४२, रा. पर्णकुटी पायथा, लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणे केले होते. त्यावरुन सध्या राज्यात मोठा गदारोळ सुरु आहे. कामरा याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कामरा याचे समर्थन करणारा फ्लेक्स छत्रपती संभाजी महाराज पुलाच्या कोपर्‍यावर लावण्यात आला आहे. या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्याखाली ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असा मजूकर लिहिण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुणाल कामरा याचे देखील या फ्लेक्सवर व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्याच्याखाली शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर व त्यासोबत मशाल हे चिन्ह असलेला आक्षेपार्ह मजकूराचा फ्लेक्स कोणातरी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या लावलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे तपास करीत आहेत.

You may have missed