Pune Crime News | पुणे : उच्च शिक्षित पण व्हॉईट कॉलर गुन्हेगारीत अडकलेल्या दोघांकडून नर्हे पोलिसांनी केले पिस्टल व 4 काडतुसे जप्त
पुणे : Pune Crime News | मुळचा अहिल्यानगर येथे राहणारा, उच्च शिक्षित असलेला तरुण व्हॉईट कॉलर गुन्हेगारी मध्ये अडकला. जीवाच्या भितीने पुण्यात येऊन लॉजवर राहू लागला. आपल्यावर कोणी गेम करु नये, म्हणून त्याने संरक्षणासाठी पिस्टल बाळगले. नर्हे पोलिसांना याची खबर लागल्यावर त्यांनी त्याला साथीदारासह पकडून पिस्टल व ४ काडतुसे जप्त केली आहे.
साहिल सतिश मेहेर Sahil Satish Meher (वय ३१, रा. नाना चौक, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर) आणि शुभम सचिन अजेटराव Shubham Sachin Ajetrao (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार भोरडे, चव्हाण असे अवैध धंद्यावर ६ एप्रिल रोजी कारवाई करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निलेश भोरडे व सुनील चव्हाण यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, अभिरुची मॉल चे बाजुला द्वारका लॉजमध्ये उतरलेल्या प्रवाशाकडे पिस्टल आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना याची माहिती देऊन पोलीस पथकाने द्वारका लॉज गाठले. दुसर्या मजल्यावरील २०५ रुमची बेल वाजविली. आतून दरवाजा उघडल्यावर रुममध्ये दोघे जण असल्याचे दिसले. त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता काळ्या बॅगेमधील कॅरी बॅगमध्ये एक लोखंडी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल मिळून आले. नर्हे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल मेहेर याने एमबीएचे शिक्षण घेतले असून त्याला शेअर मार्केटचा नाद आहे. शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवणुक करुन जादा परतावा मिळवून देतो, असे सांगून त्याने अनेकांना टोप्या घातल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्येही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. लोकांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो अहमदाबादला पळून गेला होता. तेथे तो एका कंपनीत नोकरी करु लागला होता. त्याची माहिती काढत लोक तिकडे संपर्क करु लागले. तेव्हा स्वत:च्या सरंक्षणासाठी त्याने अहमदाबादमधून एक पिस्टल व ४ काडतुसे विकत घेतली होती. त्यानंतर ५ दिवसांपूर्वी तो पुण्यात येऊन द्वारका लॉजला रहात होता.
शुभम अजेटराव हा त्याचा मित्र असून त्याने ही इंजिनियरींगचे शिक्षण घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार प्रणील मेस्त्री, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे यांनी केली आहे.
