Pune Crime News | पुणे पोलिसांची राजस्थानामध्ये जाऊन कारवाई; अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त, 4 कोटी 27 लाखांचा माल जप्त
पुणे : Pune Crime News | पुण्यात येणार्या अवैध शस्त्रांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील गावात जाऊन पिस्तुले बनविणारे कारखाने उद्धवस्त केले होते. त्याचप्रमाणे पुण्यात अंमली पदार्थांची तस्करी करणार्याचे राजस्थानमधील रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पुणे व राजस्थानमध्ये एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी १ किलो ९६० ग्रॅम मेफॅड्रॉन (एम डी) जप्त करुन ४ कोटी २७ लाखा ९ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खराडी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.
खराडी येथील सार्वजनिक रस्त्यावर दोघांना पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून २७ ग्रॅम मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ व अन्य साहित्य असा १२ लाख ४१ हजारांचा माल जप्त केला. या गुन्ह्यात मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. वाघोली), हरिष सुजना रामदेवासी (वय २२, रा. वाघोली) या दोघांना ३ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांचे गिफ्ट शॉप असून ते मुळचे राजस्थानमधील जोधपूरचे राहणारे आहेत. गेल्या वर्षभरापासून ते अंमली पदार्थाचा व्यवसाय करीत असल्याचे तपासात उघड झाले. मोतीसिंह राजपुरोहित याच्याकडे केलेल्या तपासात योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई हा राजस्थान येथून एम डी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी ७ फेब्रुवारी रोजी मनीष बिष्णोई (वय ३०) याला सापळा रचून पकडून ३० लाख २० हजार रुपयांचे १५१ ग्रॅम मेफॅड्रॉन जप्त केला. त्याच्याकडील चौकशीत त्याचा मावस भाऊ सचिन ऊर्फ एस के रमेशकुमार बिष्णोई (वय २०) हाही अंमली पदार्थ घेऊन आला असल्याचे समजले. त्याला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एम डी विक्री करुन मिळालेले ४ लाख ६५ हजार रुपये जप्त करण्यात आले. त्याने अमित सुनिल घुले (वय ४०, रा. मांजरी) याला अंमली पदार्थ विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अमित घुले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ७९ लाख ६० हजार रुपयांचा ३९८ ग्रॅम मेफेड्रॉन व दोन मोबाईल असा १ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
या गुन्ह्याचा तपासाचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, निखील पिंगळे यांनी आढावा घेऊन राजस्थान येथील अंमली पदार्थ व्यवसायामध्ये सक्रीय असणार्या टोळीचे रॅकेट उद्धवस्त करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यासाठी खास तपास पथक तयार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना तपासाबाबत सुचना देण्यात आला. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, यांच्या अधिपत्याखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, मनोज बागल, नितीन राठोड व पोलीस पथक व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक नितीनकुमार नाईक असे एकूण ५ अधिकारी व २० अंमलदार यांचे वेगवेगळी ५ पथके तयार करुन त्यांना ९ फेब्रुवारी रोजी राजस्थानला रवाना केले.
या तपास पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी राजस्थान येथे दोन आरोपी यांच्यासोबत घेऊन जाऊन आरोपींची घरझडती घेतली. त्यांच्या संपर्कातील एम डी अंमली पदार्थ मुख्य वितरक रतनलाल किष्णाराम जाठ (वय २०, रा. बलदेवनगर, बालोतरा, मुळ रा. पिरानी साई योकीढानी, बालोतरा) याला ११ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांचा १३८४ ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत केला.
या तपासादरम्यान, पुण्यातून फरार असणारा व अंमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये सक्रीय असणारा रामकरण जाट ऊर्फ चौधरी ऊर्फ सियाग (रा. कपोरिया ओसीया, जोधपूर) याला पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड व त्यांच्या पथकाने १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. आरोपींकडून एकूण १९६० ग्रॅम मेफेड्रॉन, ३ कोटी ९२ लाख रुपये चा ऐवज व ३५ लाख ९ हजार रुपयांचे मोबाईल, फॉर्च्युनर गाडी व तत्सम साहित्य असा ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करुन एम डी रॅकेटमध्ये सक्रीय असणारी टोळी उद्धवस्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार श्रीकांत शेडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, सुरेंद्र साबळे, निलम कर्पे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक सुरज जाधव, विलास केदारी, अशोक केदार, वाघोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार पांडुरंग माने, गहिनीनाथ बोयणे, सुनिल कुसाळकर, लोणीकंद पोलीस ठाण्याचे अमोल ढोणे, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार अंकुश जोगदंड, लालु कर्हे, राहुल जोशी, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार अमोल सोनवणे, संदीप जाधव, तांत्रिक विश्लेषक प्रविण गव्हाणे यांनी केली आहे.
