Pune Crime News | पुणे : हारपिक, ऑल आऊटच्या बनावट बाटल्यांची विक्री करणार्या दुकानावर छापा; बनावट माल जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | हारपिक, ऑल आऊट, लायझोल अशा कंपन्यांच्या बनावट उत्पादनांची विक्री करत असलेल्या आंबेगाव येथील दुकानांवर आंबेगाव पोलिसांनी छापा टाकून १ लाख ६० हजार ७६७ रुपयांची बनावट उत्पादने जप्त केली आहेत. (Ambegaon Police)
याबाबत अशरफुद्दीन फैयाजुउद्दीन इनामदार (वय ४१, रा. शास्त्रीनगर, रहाटणी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उबेद आसिफ शेख (वय २९, रा. हडपसर, सध्या रा. वाघजाईनगर, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आशर आईपी प्रोटेक्शन एजन्सीचे प्रतिनिधी आहे. हारपिक कंपनीची लिक्वीडची बाटली, लायझोल लिक्वीडची बाटली, ऑल आऊट लिक्वीड बाटली, टाटा टी अग्नी यांचा बनावट माल विकला जात असल्याची माहिती फिर्यादींना मिळाली होती. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलिसांनी वाघजाईमाता मंदिराशेजारील उबेद शेख याच्या दुकानावर शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता छापा टाकला. त्यात हारपिक, लायझोल, ऑल आऊट, टाटा टी अग्नी या कंपनींची उत्पादने बनावटीकरण करुन विक्री केली जात असल्याचे दिसून आले. दुकानातून पोलिसांनी १ लाख ६० हजार ७६७ रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.