Pune Crime News | पुणे : धक्कादायक ! आयटी अभियंता तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन सामुहिक बलात्कार; धमकावून उकळले 30 लाख रुपये, 2 आयफोन

Gang Rape

पुणे : Pune Crime News | पुण्यातील आय टी कंपनीत नोकरी करणार्‍या एका तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचाराचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 10 लाख रुपये रोख, 18 लाखांचे कर्ज व दोन आयफोन उकळण्यात आले आहेत. (Gang Rape In Pune)

या प्रकरणी एका ३३ वर्षाच्या तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली, मुंबई) व त्याच्या तीन मित्रांवर बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणुक, अपहार अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 नोव्हेबर 2021 रोजी कांदिवली येथील फॅब हॉटेल स्प्रिंगईन तसेच कारमध्ये घडला होता. त्यानंतर 13 मे 2022 पर्यंत घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही मुळची कर्नाटकातील राहणारी आहे. ती आय टी अभियंता असून पुण्यात नोकरीनिमित्त रहात आहे. तिची फेसबुकवर तमीम खान याच्याशी ओळख झाली, खान याने त्याच्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय आहे. तो सर्व पाहतो, असे सांगितले. त्यातून दोघांची ओळख वाढत गेली. त्याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यातून ही तरुणी त्याला भेटायला कांदिवली येथे गेली होती. येथील फॅब हॉटेलमध्ये ते भेटले. त्यावेळी त्याने या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. खान याने तरुणीला आपल्या कारमध्ये नेऊन त्याने आपल्या अन्य तिघा मित्रांना बोलावून घेतले. या तिघांनी या तरुणींवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला. या तरुणीवर अत्याचार करतानाचे त्यांनी फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीकडून वेळोवेळी पैसे उकळले. तिच्याकडून असे 10 लाख रुपये रोख घेतले. तसेच विविध बँकांकडून तिला 18 लाख रुपयांचे कर्ज काढायला लावून ते पैसे उकळले. या तरुणीच्या क्रेडिट कार्डवरुन दोन आयफोन खरेदी केले. या तरुणीने दिलेले पैसे परत मागितले असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आपल्या बदनामीच्या भितीने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. शेवटी तिने दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडे धाव घेऊन हा सर्व प्रकार सांगितला. काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो कांदिवली पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.