Pune Crime News | पुणे: सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल ; राहत्या घरात गळफास घेत संपवलं जीवन

पुणे : Pune Crime News | सासूने सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नीता सचिन निगडे (वय-३३) असे विवाहितेचे नाव असून याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील नीरा येथे येथे घडली आहे. याबाबत नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने (रा- श्रीगोंदा, ता-आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली. (Suicide Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी सचिन आणि नीता यांचा विवाह झाला होता. नीता यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मात्र सासू विजया निगडे या नीता यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिनवणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे, नवीन फ्लॅट घेतलाय राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून १ लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे, अशा प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. (Jejuri Pune Crime News)
अखेर या त्रासाला कंटाळून नीता यांनी नीरा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ मार्च रोजी घडली होती. त्यानंतर सासू विजया निगडे यांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत.