Pune Crime News | पुणे : हातउसने दिलेले पैसे परत कधी करणार याची विचारणा केल्याने दोघा भावांनी लोखंडी रॉड डोक्यात मारुन केले जखमी

पुणे : Pune Crime News | पुतण्याला हात उसने दिलेले पैसे परत कधी करणार अशी विचारणा केली तसेच मोठ्या भावाचा फोन उचलला नाही, या रागातून मोठा व लहान भावाने लाकडी दांडक्याने, लोखंडी रॉडने डोक्यात मारुन आपल्या भावाला गंभीर जखमी केले.
याबाबत रवी बुदीअप्पा राठोड (वय ३५, रा. माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांचे भाऊ अमरिश बुदीअप्पा राठोड (वय ५०) आणि लहान भाऊ संतोष बुदीअप्पा राठोड (वय ३०, दोघे रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार त्यांच्या घरासमोर २० मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी असलेले त्यांचे भाऊ हे शेजारी शेजारी राहतात. फिर्यादी रवी राठोड यांनी त्यांचा भाऊ तिरुपती राठोड याचा मुलगा राजू राठोड (वय १९, रा. पिंगळे वस्ती, मुुंढवा) याला सहा महिन्यापूर्वी हातउसने म्हणून ३५ हजार रुपये दिले होते. तो १९ मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या घराजवळ दिसला. तेव्हा त्यांनी राजू राठोड याला मी दिलेले पैसे परत कधी करणार, अशी विचारणा केली. तेव्हा तो रागाने चिडून निघून गेला. त्यावेळी फिर्यादी यांचा लहान भाऊ संतोष राठोड याने फोन केला होता. परंतु, त्यांनी कॉल उचलला नाही.
दुसर्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांच्या घराशेजारी राहणारा मोठा भाऊ अमरिश राठोड व लहान भाऊ संतोष राठोड हे घरी आले. त्यांनी काही कळायचे आत मारहाण करायला सुरुवात केली. संतोष राठोड याने लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमरिश राठोड याने लोखंडी रॉड डोक्यात मारुन जखमी केली. त्यांच्या पत्नी सिताबाई राठोड यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर दोन्ही भाऊ पळून गेले. ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर रवी राठोड यांनी फिर्याद दिली. पोलीस हवालदार गव्हाणे तपास करीत आहेत.