Pune Crime News | पुणे : मित्राबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या पत्नीचा चाकूने वार करुन खुन, प्रचंड खळबळ
पुणे : Pune Crime News | पतीबरोबर भांडणे करुन प्रेमसंबंध असलेल्या मित्राबरोबर पत्नी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. पतीकडे तिचे दागिने मागत होती. त्याच रागातून पत्नीवर चाकूने वार करुन तिचा खुन केला. लोणीकंद पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नम्रता शैलेंद्र व्हटकर ऊर्फ नम्रता चंद्रशेखर इंगळे (वय १९) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत शाहरुख दस्तगीर पठाण (वय २३, रा. बालाजी सोसायटी, शिरसवडी, वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी हायस्कुलच्या मागे २२ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख पठाण व नम्रता व्हटकर हे गेली २ महिन्यांपासून एकत्र राहण्यास आहे. नम्रता व पठाण यांची सहा महिन्यांपूर्वी वेकफिल्ड कंपनीत कामास असताना ओळख झाली होती. तिचे २ वर्षांपूर्वी शैलेंद्र व्हटकर याच्याबरोबर विवाह झाला होता. नम्रता व पठाण यांचे प्रेमसंबंध असल्याचे शैलेंद्र याला समजल्यावर तो वारंवार नम्रताशी भांडण करत असे. त्याबाबत तिने पठाण याला सांगितले होते. दोन महिन्यांपूर्वी नम्रता शैलेंद्र याच्याबरोबर भांडणे करुन पठाण याच्याकडे राहण्यास आली होती. परंतु, नम्रताचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडे असल्याने ती वारंवार दागिण्यांची मागणी करत होती.
२२ जानेवारी रोजी पठाण हा कामानिमित्त शिरुर येथे गेला होता. रात्री ८ वाजता पुन्हा घरी आला. त्यावेळी नम्रता हिने त्याला सांगितले की, शैलेंद्र याला फोन करुन दागिने मागितले आहेत. त्यानंतर शैलेंद्र याने फोन करुन नम्रताला फोन दे, असे सांगितले. तेव्हा दोघांमध्ये बोलणे झाले. शैलेंद्र याने वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलाविले असल्याचे सांगितले. तेव्हा नम्रता, पठाण हे नम्रताच्या गाडीवर व त्यांचा मित्र हरिष कोळपे हा त्याचे गाडीवर तिघे वाडेबोल्हाई चौकामध्ये आले. तेव्हा शैलेंद्र याने तो जोगेश्वरी हायस्कुलचे पाठीमागे थांबला असल्याचे सांगितले. तेव्हा नम्रता तिच्या गाडीवर पुढे गेली. हरिष याने त्याच्या गाडीवरुन त्यांच्यापासून काही अंतरावर सोडून तो निघून गेला. पठाण त्यावेळी मंदिराचे बाजुला थांबला होता. तेथून मंदिराच्या उजेडात नम्रता व शैलेंद्र दिसत होते.
रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक नम्रताच्या ओरडण्याचा आवाज आला. पठाण धावत गेला असताना शैलेंद्र हा त्याच्याकडील चाकूने नम्रताचे गळ्यावर व चेहर्यावर वार करत होता. शाहरुख पठाण याने त्याला बाजूला ढकलून दिले व नम्रताला पकडले. मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा शैलेंद्र हा चाकू व त्याची दुचाकी तेथेच टाकून पळून गेला. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरुन नम्रता हिला वाघोली येथील रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाला होता. लोणीकंद पोलिसांनी शैलेंद्र व्हटकर याला अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराज कुंभार तपास करीत आहेत.
