Pune Crime News | पुणे: लक्झरी कार विक्रीच्या नावाखाली महिलेला घातला 1 कोटींचा गंडा; डेक्कन पोलिसांकडून मोहम्मद बागवानला अटक तर संजय ब्रम्हानंद अगरवाल फरार
पुणे : Pune Crime News | जुन्या गाड्यांची खरेदी विक्रीचा व्यवसाय एकत्रितपणे करु, असे सांगून गाड्यांच्या खरेदीसाठी १ कोटी २१ लाख रुपये घेऊन ९७ लाख रुपयांना दोघांनी गंडा घातला़ डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मोहम्मद बागवान (वय ४६, रा. सरीता अपार्टमेंट, कासारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार संजय ब्रम्हानंद अगरवाल Sanjay Brahmanand Agarwal (रा. कुंदन होम, एलफिस्टन रोड, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत नयन बलबीर आगरवाल (वय २८, रा. आरती अपार्टमेंट, एरंडवणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एरंडवणे येथील आरती अपार्टमेंट येथे सप्टेंबर २०२२ ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ३ वर्षांपूर्वी त्या वडील बलबीर अगरवाल यांच्याबरोबर चार चाकी गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. संजय आगरवाल हा त्यांच्या वडिलांचा मित्र आहे. त्यांच्या घरी जाणे येणे होते. सप्टेंबर २०२२ दरम्यान संजय अगरवाल हे त्यांच्या घरी आले. त्यांनी सांगितले की, मोहम्मद बागवान याच्यासोबत जुन्या चारचाकी गाड्यांची खरेदी विक्रीचा व्यवसाय करु. त्यानुसार, ते गाड्यांचे फोटो पाठवतील, त्या गाडीचे अगाऊ रक्कम देऊन गाडीची डिलिव्हरी झाल्यावर उर्वरीत रक्कम त्यांना द्यायची, असे ठरले होते. काही दिवसांनी संजय अगरवाल याने काही गाड्यांचे फोटो पाठविले. त्यांना गाडीचे मॉडेल पसंद पडल्यानंतर त्यांनी अगाऊ रक्कम दिली. त्यानंतर ५ गाड्यांची डिलिव्हरी मुदतीत दिली होती. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर १६ चारचाकीसाठी त्यांनी अगाऊ रक्कम म्हणून १ कोटी २१ लाख रुपये दिले.
त्यांनी चौकशी केल्यावर संजय अगरवाल हे पुढील १५ दिवासंमध्ये सर्व गाड्यांची डिलिव्हरी देतील, असे सांगितले. मुदतीत गाड्या न दिल्यास सर्व रक्कम परताव्यासहीत परत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ठरलेल्या १६ गाड्यांपैकी एक ऑडी गाडी त्यांनी दिली. ही गाडी फिर्यादी यांनी एका ग्राहकाला विकली. परंतु गाडीमध्ये तांत्रिक अडचण येऊ लागल्याने ग्राहकाने त्यांना गाडी परत केली. त्यांची सर्व रक्कम फिर्यादी यांनी परत केली. उरलेल्या गाड्या लवकरच देतो, असे सांगून ऑडी संजय अगरवाल घेऊन गेले. त्यासाठी दिलेल्या १८ लाख ५० हजार रुपयांपैकी ९ लाख रुपये अगरवाल याने दिले.
उर्वरीत ९ लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर ते टाळाटाळ करुन लागले. तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करु, असे सांगितल्यावर त्याने २३ मार्च २०२५ रोजी १० लाख रुपये आणि २५ जून २०२५ रोजी ५ लाख रुपये दिले. उर्वरित ९७ लाख १ हजार रुपये याची मागणी केल्यानंतर अगरवाल हे नेहमी पुढच्या तारीखा देत असत. गेल्या वर्षभरात त्यांनी उरलेले पैसे परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद नयन आगरवाल यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील तपास करीत आहेत.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, या फसवणुकीच्या गुन्ह्यात मोहम्मद बागवान याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. संजय अगरवाल हा फरारी झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
