Pune Crime News | लक्ष्मी रोडवरील घराच्या ड्रेनेजच्या कामाच्या नावाखाली सेवानिवृत्त अधिकार्‍याला ब्लॅकमेल करुन 6 कोटी 70 लाखांना घातला गंडा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लक्ष्मी रोडवर असलेल्या घराच्या जागातील झाडांची मुळे ड्रेनेजमध्ये गेली असल्याचे सांगून ती नव्याने बांधावी लागेल, असे सांगून त्याच्या खचार्साठी संपर्क साधल्यानंतर त्या कामाबरोबरच वेगवेगळी कारणे सांगून ज्येष्ठ नागरिकाला गेली २ वर्षे ब्लॅकमेल करुन सायबर चोरट्यांनी तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत नारायण पेठेत राहणार्‍या एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधल्यानंतर आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संदिप चव्हाण, आदित्य चव्हाण, जितेन सोळंकी शर्मा, राऊत, बँक मॅनेजर आणि जज्ज म्हणून नाव सांगणारा, महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार २८ एप्रिल २०२४ पासून सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईच्या नावावर लक्ष्मी रोडवरील लक्ष्मी पार्क सोसायटीत जागा आहे. त्यांना एके दिवशी या जागेबाबत फोन आला. त्याने सांगितले की, सोसायटीने ड्रेनेजचे काम करायला सांगितले आहे. तुमच्या जागेत ड्रेनेजमध्ये झाडाची मुळ गेलेली आहेत. त्यामुळे ते नव्याने बांधावे लागेल, असे सांगून त्यासाठी वैयक्तिक खर्च, साहित्यासाठी लागणारा खर्च, कामासाठी लागणारे मशीनचा डिपॉझिट यासाठी पैसे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेतले.

या कामासाठी पुणे महानगर पालिकेची परवानगी घ्यावी लागेल, त्याचे चलन, ट्रान्सफर चार्जेस, सर्व्हिस चार्जेस, बँकेच्या खात्यामध्ये बॅलन्स मेन्टेन करणे अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून संदिप चव्हाण व आदित्य चव्हाण हे पैसे उकळत राहिले. ते पैसे देत असल्याचे पाहून त्यांनी संदिप चव्हाण यांच्या मुलाचे ऑपरेशन म्हणून त्यांच्याकडून वारंवार पैसे घेतले. त्यानंतर त्याचा मुलगा वारला. राऊतचा मुलगा वारला, अशी कारणे सांगितली. एकदा त्यांना एक जज्ज बोलतोय, असे सांगून त्यांच्या नावाने ब्लॅकमेल करणे सुरु केले.

आदित्यच्या मुलाचे ऑपरेशन आहे, त्या जज्जची बायको वारली, अशी कारणे सांगून त्यांना धमकावुन पैसे देण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून सायबर चोरट्यांनी तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपये घेतले. त्यांनी लक्ष्मी रोडवरील सोसायटीमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यावर घराजवळच्या ड्रेनेजचे कोणतेही काम केलेले दिसून आले नाही. शेवटी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधला. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करीत आहेत.

You may have missed