Pune Crime News | एकाच ठिकाणी दुसर्यांदा केली चोरी, शेवटी पोलिसांच्या लागला हाती ! फुरसुंगी पोलिसांनी आंतरराज्य चोरट्याला केले जेरबंद, बँकेतील 5 लाखांची रक्कम गोठवली
पुणे : Pune Crime News | भेकराईनगर चौक येथे असलेल्या ८ दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून त्याने ४ लाख रुपयांची रोकड ऑगस्टमध्ये चोरुन नेली होती. हा गुन्हा पचल्याने त्याने २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा त्याच दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून पीओपी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र त्याला गल्ल्यातील केवळ ३ हजार रुपयेच मिळाले. एकाच ठिकाणी दोनदा चोरी झाल्याने फुरसुंगी पोलिसांनी त्याचा नेटाने तपास करुन आंतरराज्य चोरी करणार्या चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.
महेश लक्ष्मीकांत पुजारी Mahesh Laxmikant Pujari (वय २१, रा. हत्तीकनबस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर अक्कलकोट, सोलापूर, हुबळी येथे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.
याबाबत विशाल यादव यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे मोबाईल शॉप आहे. ३ ऑगस्ट रोजी यांच्या दुकानाचा पत्रा उचकटून आतील पीओपी फोडून दुकानात उतरला. मोबाईल घेण्यासाठी ठेवलेले १ लाख १४ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. त्याचबरोबर त्यांच्या शेजारील पुरोहित स्वीटमधील १ लाख २५ हजार आणि ३५ हजार रुपये तसेच अन्य ५ दुकानातून १ लाख २७ हजार रुपये अशी ४ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली होती. मोबाईल दुकानातील सीसीटीव्हीमध्ये पीओपी फोडून आतमध्ये चोरटा येत असल्याचे दिसून येत होते. या गुन्ह्यांचा शोध घेत असताना चोरटा काही मिळून येत नव्हता.
त्यानंतर २७ व २८ नोव्हेंबरच्या रात्री विशाल यादव यांच्या दुकानात पुन्हा त्याच पद्धतीने पीओपी फोडून चोरटा आत शिरला व त्याने गल्ल्यातील ३ हजार रुपये चोरुन नेले होते. यावेळीही चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. दोन्ही वेळेला चोरी करण्याची पद्धत एकसारखी होती. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र पाठविले. त्यातून पोलीस हवालदार नितीन गायकवाड व पोलीस अंमलदार हेमंत कामथे यांना १ डिसेंबर रोजी बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाचा एक संशयित भेकराईनगर बसस्टॉपसमोर थांबला आहे. पोलीस पथक तातडीने तेथे रवाना झाले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या महेश पुजारी याला पकडले. त्याच्याकडे येथे येण्याचे कारणाबाबत चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली.
अधिक तपासात त्याने यापूर्वीही त्याच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीत मिळालेली रक्कम मौजमजेसाठी खर्च करुन उर्वरीत पैसे बँक खात्यात जमा केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्याच्या बँक खात्याची माहिती घेतल्यावर त्यामध्ये ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्याचे दिसून आले. पोलिसांनी बँकेला सांगून ही रक्कम गोठवली आहे. चोरी करण्याकरीता वापरलेली साधने त्यामध्ये स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी पाने, पक्कड, कपडे, दुचाकी असा १ लाख ३४ हजार ७८० रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याकडून यापूर्वीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. तपास पथकातील तांत्रिक विश्लेषण काम पाहणारे पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
ही कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, हरीदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत काथले, अभिजित टिळेकर, योगश गायकवाड, विनायक पोमण, नितीन सोनवणे यांनी केली आहे.
