Pune Crime News | ग्राहक पळवून नेत असल्याच्या संशयावरुन सलुन मालकाने पूर्वीच्या कामगार तरुणावर मारहाण करुन केला खुन, बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  पुर्वी काम करीत असलेला कामगार हा आपले ग्राहक पळवुन नेत असल्याच्या संशयाने सलुन मालकाने साथीदारांच्या मदतीने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा जीव घेतला. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

मोहमद शमी फिरोज कुरेशी (वय २५, रा. साई स्मार्ट हेअर सलुन, अप्पर जुना बसस्टॉप, बिबवेवाडी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ रोहिदास चोरघे (वय २२, रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी), अनिकेत सतिश चर्‍हाटे (वय २७,  रा. हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव), रोहित संतोष भालशंकर (वय २४, रा. भोलेनगर, जांभुळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मोहमंद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट हेअर सलुन, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बिबवेवाडीतील साई स्मार्ट हेअर सलुन येथे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी भाऊ हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील राहणारे आहेत. सौरभ रोहिदास चोरघे यांचे कात्रज येथे  ट्विस्टर  सिझर मेन्स सलुन हे दुकान आहे. तेथे मोहमद शमी कुरेशी हा दोन वर्षांपासून कामाला होता. २६ जानेवारी २०२६ रोजी त्याने त्यांच्याकडील काम सोडले व तो गावी गेला होता. त्याने आपला लहान भाऊ सलमान कुरेशी यांना सांगितले की, अप्पर येथे नवीन दुकान चालू करणार आहे. तेव्हा ते दोघे ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात आले. तेथे देवेंद्र शरद हडपद यांचे साई स्मार्ट हेअर सलुन हे दुकान चालविण्यास घेतले. तेथे काम करुन दोघेही तेथेच रहात होते.

मोहम्मद शमी हा पूर्वी सौरभ चोरघे यांच्या ट्विस्टर सिझर मेन्स सलुनमध्ये कामाला असल्याने तेथील ग्राहक त्याच्या ओळखीचे झाले होते. त्यांनी नवीन दुकान सुरु केल्याने ते ग्राहक आता त्यांच्याकडे येऊ लागले होते. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता ते दोघे दुकानात असताना सौरभ चोरघे, त्यांचे मित्र अनिकेत चर्‍हाटे, रोहिल भालशंकर हे दुकानात आले. सौरभ चौरघे शमी कुरेशी यांना म्हणाले, तू माझ्या ग्राहकांना फोन करुन का बोलवितो, त्यावेळी शमी कुरेशी म्हणाला, ते मला बघुन माझ्याकडे केस कापण्यासाठी येतात. त्यावर सौरभ चौरघे याने शमीच्या कानाखाली मारली. तेव्हा शमीनेही त्यांच्या कानाखाली मारली. त्यावर सौरभ व त्याच्या दोघा मित्रांनी शमी याला खाली पाडून छातीत व पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ते पाहून त्यांच्या मालकांनी ११२ वर फोन केला. तेव्हा पोलिसांनी येऊन तिघांना पकडून नेले.

सलमान यांनी आपला भाऊ शमी कुरेशी याला प्रथम डॉ. बोरकर यांच्याकडे नेले, त्यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला भारती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी तपासणीपूर्वी मोहमद शमी हा मृत्यु झाल्याचे सांगितले. तीन ठिकाणी नेण्याच्या धावपळीत शमी याचा मृत्यु झाला.
बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.

You may have missed