Pune Crime News | कौटुंबिक वादातून सलुन मालकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कौटुंबिक वादातून सलुन मालकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन वारजे पोलिसांनी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
याबाबत दत्तात्रय बाबुराव क्षीरसागर (वय ६८, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रतिभा महेश क्षीरसागर (वय ३५, रा. शोभा हाईटस सोसायटी), दांगट इस्टेट, शिवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवणे येथील दांगट इस्टेटमधील शोभा हाईटस सोसायटीत २ फेब्रुवारी रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश क्षीरसागर यांचे शोभा हाईटस येथे सलुन आहे. सुमारे १३ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु, दोघा पतीपत्नीचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. कौटुंबिक वादातून गेल्या वर्षी प्रतिभा क्षीरसागर या माहेरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर महेश यांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत घरी आणले होते. त्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. या कौटुंबिक त्रासाला कंटाळून महेश क्षीरसागर यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. महेश क्षीरसागर यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधी पार पडल्यावर त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे तपास करीत आहेत.
