Pune Crime News | समर्थ क्रॉप केअर कंपनीचा मालक प्रशांत गवळीला पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अटक; महिलांना 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवून केली होती फसवणूक

Pune Crime News | Samarth Crop Care Company owner Prashant Gawli arrested after Police Commissioner's order; Women were cheated by luring them with 10 percent refund

पुणे : Pune Crime News | समर्थ क्रॉप केअर या कंपनीच्या माध्यमातून महिलांना १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या प्रशांत अनिल गवळी (Prashant Anil Gavali) याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. गवळी याने गुंतवणुकदारांकडून सुमारे १५ कोटी रुपये उकळल्याचे सांगितले जाते.

शेतमाल एक्सपोर्ट करण्याच्या नावाखाली समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक प्रशांत गवळी व इतरांनी गुंतवणूकदारांना १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह राज्यातील १२ हून अधिक जिल्ह्यातील ४० ते ४४ हजारांहून अधिक गुंतवणुकदारांनी समर्थ क्रॉप केअरमध्ये गुंतवणूक केली आहे. गवळी व त्याच्या साथीदारांनी प्रामुख्याने महिलांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर महिन्याला ५ टक्के नफा व ५ टक्के मुद्दल रक्कम अशा प्रकारे १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. सुरुवातीला काही काळ त्याने परतावा दिला. परंतु, सप्टेंबरपासून मुद्दलही नाही आणि नफाही कोणाला देण्यात आला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारामध्ये फसवणूक करण्यात आल्याची भावना होती. याबाबत गुंतवणूकदारांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या.

प्रशांत गवळी याने अनेकदा वेगवेगळी कारणे सांगून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यात येतील, असे वायदे केले होते. मागील तीन वायदे फोल ठरल्यानंतर त्याने आता फेब्रुवारीपासून परतावा देण्याचा नवा वादा केला होता. परंतु, त्याच्यावर आता गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला होता. या गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले. त्यानंतर अमितेशकुमार यांनी गुन्हा दाखल करुन कारवाईचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तिय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी प्रशांत गवळी याला अटक करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, समर्थ क्रॉप केअर प्रकरणात फसवणूक झालेल्या अन्य नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You may have missed