Pune Crime News | 71 वर्षाच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण करुन घरातून निघून जाण्याची धमकी देणाऱ्या मुलगा व सुनेवर समर्थ पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पुणे : Pune Crime News | स्वत:च्या घरात रहायचे नाही. घरातून निघून जा, अशी धमकी देऊन आईला मुलगा व सुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी मुलगा व सुनेवर माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत नरगीस बानो अब्दुल अजीज शेख (वय ७१, रा. मदमजी पार्क, वसंत सोसायटी, न्यू नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अब्दुल रशिद शेख (वय ४०), फातेमा अब्दुल राशिद शेख (वय २८, रा. वसंत सोसायटी, पदमजी पार्क, न्यू नाना पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२४ पासून आजपर्यंत सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरगीस शेख यांच्या पतीने त्या रहात असलेला फ्लॅट २००३ मध्ये खरेदी केला असून तेव्हापासून त्या तेथे रहातात. हा फ्लॅट त्यांच्या नावावर आहे. त्यांना तीन मुले आणि पाच मुली आहेत. सर्व मुलींचे विवाह झाले असून धाकटा मुलगा हाफिज हा अविवाहित आहे. त्यांचा मोठा मुलगा अब्दुल रशीद हा दोन वर्षांपूर्वी त्यांच्या घरी राहण्यास आला. त्याने भावनिक दबाव आणल्याने त्यांनी घरात राहण्यास परवानगी दिली.
मोठा मुलगा अब्दुल हा हाफिज मोहम्मद याच्यावर खोटे आरोप करुन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असतो. त्यामुळे त्यांचा लहान मुलगा हाफिज मोहम्मद हा गेल्या ३ महिन्यांपासून मस्जिदमध्ये राहण्यास गेला आहे. त्याबाबत अब्दुल रशीद व त्याच्या पत्नीला विचारले असता त्यांनी आपल्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यांना वेळेवर जेवण न देणे, तसेच कधीकधी उपाशी ठेवून छळ करण्यास सुरुवात केली. त्यांना त्यांच्या इतर मुलांना, नातेवाईकांना भेटून देत नाही.
अब्दुल रशिद व फातेमा यांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत तसेच त्यांचे घर खाली करण्याबाबत त्यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षात एप्रिल २०२४ मध्ये तक्रार अर्ज दिला होता. त्यावेळी त्याने दीड महिन्यांच्या आत घर खाली करणार असल्याचा जबाब दिला होता. तरीही त्याने अजून पर्यंत घर खाली केले नाही. उलट फिर्यादी यांना शिवीगाळ तसेच धमकी देऊन आम्ही घर खाली करणार नाही, असे म्हणतात. त्याच्या अशा वागण्यामुळे त्यांना मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. वयोमानाने त्यांना हा त्रास सहन करणे अवघड झाल्याने त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
