Pune Crime News | इमारतीच्या 7 व्या मजल्यावरुन उडी मारुन ज्येष्ठ नागरिकाने संपविले जीवन; स्विटी असोसिएटसचे जयंतीलाल ताराचंद ओसवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | बाणेर येथील जागा विकसित करण्यासाठी दिली असताना करारानुसार मिळकतीमध्ये फ्लॅट न देता फसवणूक करुन मानसिक त्रास दिल्याने जी जागा विकसित करण्यासाठी दिली होती, त्या  जागेवरील इमारतीच्या ७ व्या मजल्यावरुन महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकार्‍याने उडी मारुन आपले जीवन संपविले.

नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ इस्ट, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. ही घटना बालेवाडी बाणेर येथील मोझे कॉलेज येथील सर्व्हे नंबर २४/१/१अ येथे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत महाजन यांचा मुलगा मयुर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ इस्ट, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्विटी असोसिएटसचे जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यावेळी त्यांनी बाणेरमध्ये जागा घेतली होती. सेवानिवृत्तीनंतर ते मुलासह अंबरनाथ इस्ट येथे रहात होते. त्यांनी बाणेर येथील जागा स्विटी असोसिएटसचे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती. फिर्यादी यांच्या जागेवर मान्य केलेल्या करारानुसार अटी व शर्तीनुसार ओसवाल यांनी या मिळकतीमध्ये फ्लॅट देतो, असे सांगितले. तरीही कराराचे पालन न करता फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली. त्यांना मानसिक त्रास दिला.

नरेश महाजन यांच्या जागेवर ७ मजली इमारत उभी राहिली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आतील कामे सुरु आहेत. नरेश महाजन हे १६ फेब्रुवारी रोजी येथे आले होते. त्यांनी कराराप्रमाणे फ्लॅट देण्याविषयी ओसवाल यांच्याशी बोलले. परंतु, त्यांनी नरेश महाजन यांना मानसिक त्रास देऊन धमकाविले. त्यांच्या त्रासाला कंटाळून ते इमारतीच्या ७ व्या मजल्यावर गेले. तेथून त्यांनी उडी मारुन आपले जीवन संपविले. बाणेर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करीत आहेत.