Pune Crime News | पुण्यात रस्त्यावर दादागिरीचा थरार! 6 जणांनी जोडप्यावर केला क्रूर हल्ला, पती ICU मध्ये (Video)

पुणे : Pune Crime News | पुण्यातील पाषाण सर्कलजवळ 18 एप्रिलच्या रात्री एका विवाहित जोडप्यावर झालेल्या निर्घृण हल्ल्यामुळे शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या जेवणानंतर घरी परतत असलेल्या केतकी भुजबळ आणि त्यांचे पती अमलदेव पी. व्ही. के. रमण यांच्यावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. या घटनेत अमलदेव गंभीर जखमी झाले असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर केतकी भुजबळ यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
रस्त्यावरच हल्ला – केतकीचा अनुभव मन हेलावणारा
एफआयआरनुसार, रात्री सुमारे ११ वाजता केतकी व अमलदेव मुकुंदनगरहून घरी परतत असताना, अॅक्टिव्हा स्कूटरवरून आलेल्या दोन नशेत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या गाडीला वारंवार अडवले. गाडीच्या काचेवर थाप मारत, शिवीगाळ करत या व्यक्तींनी दहशत निर्माण केली. केतकी यांनी इन्स्टाग्रामवर हा संपूर्ण अनुभव शेअर करताना सांगितले की, “ते लोक आमच्या गाडीला जवळपास 20 मीटरपर्यंत अडवत राहिले. जेव्हा आम्ही गाडी थांबवून कारण विचारले, तेव्हा त्यांनी थेट अमलदेववर हल्ला चढवला.”
हल्ला आणखी वाढला, चारजणांनी केला सहभाग
अचानक आणखी चारजण घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनी अमलदेवला पकडले, तर उरलेल्या टोळक्याने दगड व काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीत केतकी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही लाथा व ठोसे मारण्यात आले. “माझ्या पोटात लाथ मारली, चेहऱ्यावर मार लागला,” असं केतकी म्हणाल्या.
गाडीचीही मोठी तोडफोड
हल्लेखोरांनी फक्त मारहाण न करता, जोडप्याच्या चारचाकी वाहनाचीही मोठी तोडफोड केली. काचा, हेडलाइट्स दगडांनी फोडण्यात आले. अमलदेव यांना नाकाचे फ्रॅक्चर, कानाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर साई श्री हॉस्पिटल (औंध) येथे आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. केतकी यांच्याही पोटात सूज आली असून, सोनोग्राफी अहवालातून ती पुष्टी झाली आहे.
कोणीही मदतीला आलं नाही – भावूक प्रतिक्रिया
या घटनेचा एक व्हिडिओ एका नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला. मात्र, दुर्दैव म्हणजे अनेकांनी हा प्रकार पाहूनही मदतीसाठी पुढे येण्याचे टाळले. “सगळे फक्त पाहत राहिले, कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यापेक्षा मोठं दु:ख काहीच नाही,” असं भावूक होत केतकी यांनी सांगितलं.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक आर. जी. भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.