Pune Crime News | देशी बनावटीचे पिस्टल बाळगणार्या अहिल्यानगरच्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन संरक्षणार्थ कमरेला पिस्तुल लावून फिरणार्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी सारसबाग परिसरातून अटक केली. त्याच्याकडून पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
विनोद चंदर शिंदे Vinod Chandar Shinde (वय ३१, रा. बुरुडगाव, ता़ जि़ अहिल्यानगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मारामारी आणि आर्म अॅक्टखाली २ गुन्हे दाखल आहेत. जुन्या भांडणातून विरोधी पार्टी आपला बदला घेतील, या भीतीने संरक्षणासाठी पिस्तुल बाळगल्याचे तो सांगतो.
सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व त्यांचे सहकारी १० एप्रिल रोजी साडेनऊ वाजता गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सागर केकाण व सुजय पवार यांना त्यांच्या बातमीदारांनी सांगितले की, एक जण सारसबाग परिसरात फिरत असून त्याच्या कमरेला पिस्तुल आहे. पोलीस पथकाने सारसबाग परिसरात शोध सुरु केला. तेव्हा आदम बाग पाठीमागील थोरले माधवराव पेशवे पथालगत फुटपाथवरील पिंपळाचे झाडाखाली एक जण संशयास्पदरित्या बसलेला त्यांना दिसून आला. पोलिसांना पाहताच तो निघून जाऊ लागला.
तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझिनमध्ये २ जिवंत काडतुसे असा ४१ हजार रुपयांचे शस्त्र आढळून आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीवर त्याने आपण फिरायला पुण्यात आल्याचे सांगितले. त्याने हे पिस्टल कोणाकडून घेतले होते. पुण्यात एकटाच नेमका कशासाठी आला होता, याचा स्वारगेट पोलीस तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस हवालदार भांदुर्ग, सागर केकाण, शिंदे, मोराळे, टोणपे, पोलीस अंमलदार पवार, चव्हाण, काळे, दुधे, घुले, केंद्रे यांनी केली आहे.
