Pune Crime News | टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन 18 वर्षाच्या युवकाने एसएससी बोर्डासह अनेकांना गंडवले, दहावीचे पेपर फुटले नसल्याचे झाले स्पष्ट
पुणे : Pune Crime News | टेलिग्राम चॅनेलवरील फिचरचा गैरफायदा घेऊन एका १८ वर्षाच्या युवकाने राज्य माध्यमिक बोर्डासह अनेकांना गंडवले. पोलिसांनी केलेल्या तपासात या युवकाने टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन अनेकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात या टेलिग्राम चॅनेलवर पेपर फुटलेला दिसत असला तरी तो परीक्षेनंतर बदलण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दहावीचा कोणताही पेपर फुटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
चैतन्य विनोद शेंडे Chaitanya Vinod Shende (वय १८) असे फसवणूक करणार्या युवकाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले.
दहावीचा गणित विषयाची प्रश्न पत्रिका भाग १ व भाग २ फुटल्याची फिर्याद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत जवळीकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली होती. परीक्षा होण्यापूर्वीच गणित १ व गणित २ यांचे पेपर टेलिग्राम चॅनेलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ या ग्रुपवर टाकल्याचे दिसून आले होते.
हा ग्रुप तयार करणार्या चैतन्य शेंडे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर फाईल मॅनिप्युलेशन तंत्राचा वापर करुन त्याने ही फसवणुक केली. टेलिग्रामवर एकदा पीडीएफ फाईल अपलोड केली की ती कधीही बदला येते, जेव्हा फाईल बदलली जाते. तेव्हा फक्त मजकूर बदलतो, तर मुळ टाइमस्टॉम्प तोच राहतो. फक्त एडिटेड असा शेरा सोबत असतो.
आरोपी परीक्षेच्या एक दिवस आधी पासवर्ड संरक्षित पीडीएफ फाईल अपलोड करायचा. त्यानंतर तो त्या ग्रुपवर मेसेज पोस्ट करायचा, ६०० रुपये दिल्यास परीक्षेचा पेपर देऊ शकतो, असा दावा करायचा. मुलांनी पैसे दिल्यानंतर तो त्यांना ताबडतोब ब्लॉक करायचा.
प्रत्यक्ष परीक्षा संपल्यानंतर तो खरी प्रश्नपत्रिका मिळवायचा आणि पूर्वी अपलोड केलेली (पासवर्ड संरक्षित) फाईल प्रत्यक्ष पेपरने बदलायचा.
त्यामुळे नंतर पाहणार्याला त्याने परीक्षेपूर्वीच प्रत्यक्ष पेपर अपलोड केला आहे. त्यातून पेपर फुटल्याचे दिसून येत होते.
टेलिग्राम चॅनेलच्या “रिप्लेस” या फिचरचा गैरफायदा घेऊन तो परीक्षा सुरु होण्यापूर्वी लीक झालेले पेपर त्याच्या ताब्यात असल्याचे भासवण्यासाठी खोटी टाईमलाइन रेकॉर्ड तयार केले. त्यामुळे त्याच्याकडे परीक्षेपूर्वीच लीक झालेला पेपर आहे, असे वाटले, असे तपासात दिसून आले आहे.
त्याने अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली, याचा तपास केला जात आहे.
