Pune Crime News | सांगा जगायचे कसे? युद्धामुळे गॅस टंचाईमुळे इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकास सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  युद्धामुळे गॅस टंचाई असल्याने अनेकांना जेवण कसे बनवायचे याचा घोर लागला आहे. त्यामुळे काही जण इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करु लागले आहेत. त्यातूनच सोशल मीडियावर पाहिलेल्या दीड हजाराची इलेक्ट्रिक शेगडी ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नागरिकाने केला. तर त्याला सायबर चोरट्यांनी ३ लाख १० हजार ५४८ रुपयांना गंडा घातला.

याबाबत कोथरुडमधील भुसारी कॉलनीत राहणाºया एका ८१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस टंचाईच्या काळात फिर्यादी यानी फेसबुकवर इलेक्ट्रिक बर्नर संदर्भात जाहिरात पाहून त्यावर दिलेल्या रविकांत कुमार याला फोन केला. त्याने एक बर्नरची किंमत १५०० रुपये सांगितली. ऑर्डर देताना ५०० रुपये अ‍ॅडव्हान्स द्यावे लागतील, बाकीचे पैसे बर्नर दिल्यानंतर द्या, असे सांगितले. त्यांनी कुमार याने दिलेल्या गुगल पेवर ५०० रुपये पाठविले. दोन तीन दिवसात बर्नर मिळून जाईल, असे सांगितले. त्यानंतर १३ मार्च रोजी त्यांना एक कॉल आला. त्याने सांगितले की उर्वरित रक्कम तुम्हाला आता द्यावी लागेल. कारण बिल जनरेट झाल्याशिवाय गोडाऊन मधून माल बाहेर जात नाही.

तुम्हाला आता ऑनलाईन १ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. नाही तर ऑर्डर कॅन्सल केली तर ओटीपी द्यावा लागेल, म्हणून त्यांनी ऑनलाईन १ हजार रुपये ट्रान्सफर केले. परंतु, त्यांना सांगण्यात आले की ट्रान्झेक्शन झालेले नाही पैसे मिळाले नाहीत, त्यावर फिर्यादी यांनी माझ्याकडून पैसे कट झाले आहेत. त्यावर अमित कुमार असे नाव सांगणार्‍याने तुमचे पैसे आले असतील तर ते पैसे तुम्हाला परत केले जातील, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून ते पुढील ट्रान्झेक्शन करत राहिले. त्यांच्या खात्यातून ५००, १हजार, १ हजार २ हजार, ३ हजार, ७ हजार, ४७ हजार ५००, ४९ हजार ५००, ४९ हजार ९९९, ४९ हजार ९९९ असे १३ ट्रान्झेक्शनमधून एकूण ३ लाख १० हजार ५४८ रुपये पाठविले गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करीत आहेत.

You may have missed