Pune Crime News | उत्तमनगरमधील सराफ दुकानदाराला मारहाण करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | उत्तमनगर येथील सराफ दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
साईराज अतुल तावरे Sairaj Atul Taware (रा. तुकाईनगर, वडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. साईराज तावरे हा सराईत गुन्हेगार असून जून २०२५ मध्ये नांदेड सिटी पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात त्याला साथीदारासह अटक करुन २ दुचाकी जप्त केल्या होत्या.
उत्तमनगर, शिवणे परिसरातील सराफ दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न १५ दिवसांपूर्वी मोरया ज्वेलर्स आणि विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दोन दुकानात झाला होता. या दुकानातून चोरट्यांच्या हाती काही लागले नव्हते.
संदेश सुभाष नांगरे (वय २८, रा. कोंढवे धावडे) यांचे उत्तमनगर मधील धावडे पेट्रोल पंपासमोर मोरया ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. २८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता ते दुकानात असताना मास्क घातलेले तिघे जण दुकानात शिरले. त्यांनी दुकानातील काऊंटरवरील काच फोडली. नांगरे यांनी विरोध केल्यावर त्यांच्यावर लोखंडी हत्याराने पोटावर वार केला. नांगरे यांनी दुकानातील सेप्टी स्टिकने प्रतिकार केल्यावर ते मोटारसायकलवरुन पळून गेले. पळून जाताना त्यांचा मास्क खाली पडल्याने त्यांनी चोरट्यांचा चेहरा पाहिला होता.या गुन्ह्यात उत्तमनगर पोलिसांनी ७ आरोपी निष्पन्न करुन चौघांना यापूर्वी अटक केली आहे. या गुन्ह्यात साईराज तावरे याचे नाव निष्पन्न झाले असले तरी तो पळून गेला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक १४ डिसेंबर रोजी आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील साईराज तावरे हा घरी आला आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथक त्याच्या घरी गेले़ त्यांनी साईराज तावरे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबुल केले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी केली आहे.
