Pune Crime News | ‘कडक फुलचंद’ पानातील ‘तो’ अंमली पदार्थ झाला निष्पन्न ! हिंजवडीतील कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या छाप्यात दाम्पत्याला अटक, ‘ड्रग अॅनलायजर किट’चा प्रथमच वापर
पुणे : Pune Crime News | पान टपरीवर मिळणार्या ‘कडक फुलचंद’ पानामुळे नशा येत असल्याच्या तक्रारीनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर येथील मैफिल पान हाऊसवर छापा टाकून पानामध्ये टाकण्यात आलेल्या अंमली पदार्थाचा अंश मिश्रित असलेली भुकटी (पावडर) जप्त केली. यावरुन शोध घेताना असता हिंजवडी येथील जांगेगावातील एका कारखान्यात याचे उत्पादन केले जात असल्याचे निष्पन्न झाले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने येथून एका दाम्पत्याला अटक केली आहे. या कारखान्यातून ६ लाख ६३ हजार रुपयांचा अंमली पदार्थ मिक्स पावडर, काळ्या रंगाचा अंमली पदार्थ मिश्रित पातळ पदार्थ, ३ मोबाईल, एक कार असा माल जप्त केला आहे.
कैलास दत्तात्रय मांढरे Kailash Dattatreya Mandhare (वय ५४) आणि अनुराधा कैलास मांढरे Anuradha Kailash Mandhare (वय ५४, दोघे रा. माळसाकांत चौक, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यापूर्वी कदम वाक वस्ती येथील मैफिल पान हाऊस येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला होता. या पान टपरीतून अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स, मेथॅम्फेटामाइन या अंमली पदार्थांचा अंश मिश्रित असलेली भुकटी (पावडर) बाळगल्याबद्दल निशांत दत्तात्रय काळभोर (वय १९), रामजी सतोष पटेल (वय ३३, रा. मैफिल पान हाऊस, कदमवाक वस्ती) यांना अटक केली होती.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी सांगितले की, फुलचंद पानामध्ये तंबाखु टाकून दिली जात असे. या नवीन ‘कडक फुलचंद’ पानामुळे गुंगी येत असल्याच्या तक्रार येत होत्या. काही जणांच्या मते त्यात गांजा मिसळत असावेत. तर काही जणांच्या मते, त्यात आफिमची पावडर करुन टाकत असावेत असे बोलले जात होते. हे पान खाल्ल्यावर नशा येत असल्याने त्याला ‘कडक फुलचंद’ म्हटले जात होते. याची माहिती मिळाल्यावर कदम वाक वस्तीमधील मैफिल पान हाऊस येथे छापा टाकला. त्यात पानामध्ये मिळली जाणारी पावडर मिळाली. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे आता पोर्टेबल ड्रग्ज टेस्टींग किट आले आहे. त्यावर टेस्ट केले असता त्यात अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स, मेथॅम्फेटामाइन (Amphetamine, Benzodiazepines, Opiates, Methamphetamine) हे चार अंमली पदार्थांचे अंश मिळाले.
ही पावडर कोठे मिळते याचा तपास केला असताना हिंजवडी परिसरातील जांबेगाव येथील चैतन्य फुड गोडावूनमध्ये ती तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. कैलास मांढरे हा अंमली पदार्थ मिश्रिम भुकटी उत्पादन व विक्री करीत असल्याचे समजले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांच्या सहकार्याने चैतन्य फुड गोडावूनवर छापा घातला. तेव्हा तेथे सुपारी, कात यांच्यासह अंमली पदार्थांचा अंश असलेली पावडर मिळाली. कैलास मांढरे हा या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत असल्याचे दिसून आले. या भुकटीमध्ये अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स, मेथॅम्फेटामाइन हे पदार्थ आढळून आले आहेत. त्यांचे सॅम्पल रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांची विक्री, तसेच तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत अमली पदार्थांची तपासणी, तसेच विश्लेषण करण्यासाठी ‘ड्रग अॅनलायजर किट’चा पहिल्यांदाच वापर करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथकाने केली.
